Coronavirus in Britain: संपूर्ण देशाचे लक्ष कोरोना व्हायरस वरील लसीकडे लागले आहे. त्यामुळे एकदा कोरोनाची लस आल्यानंतर नागरिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र याच पार्श्वभुमीवर ब्रिटेन येथून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे ब्रिटेन येथे कोरोनाच्या नव्या रुपाने थैमान घातले आहे. यामुळे आता ब्रिटिश सरकारने देशातील चौथ्या टप्प्यात अधिक कठोर लॉकडाऊन लागू केला आहे. ब्रिटेनचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक (Matt Hancock) यांनी असे म्हटले आहे की, हा नव्या प्रकारचा कोरोना व्हायरस अत्यंत धोकादायक आहे. तो देशात नियंत्रणाबाहेर गेला आहे. त्यामुळेच ब्रिटेन मधील बहुतांश ठिकाणी कठोर लॉकडाऊन केला आहे. हा नवा कोरोना व्हायरस ब्रिटेनच्या दक्षिण-पूर्व परिसरात सर्वाधिक फैलाव करत आहे. या स्थिती मुळे देशांच्या विमानसेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत.
जवळजवळ 1.6 कोटी ब्रिटिश नागरिकांना घरीच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लंडनमध्ये ही पुन्हा एकदा चौथ्या टप्प्यातील नियम अधिक कठोर करत तेथे ही लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. ब्रिटिश सरकारने देशात आतापर्यंतचे सर्वाधिक कठोर नियम लागू केले आहेत. सरकारने क्रिसमसचे प्लॅन ही कमी केले आहेत.तर कोरोनाचे हे नवे रुप पाहता ब्रिटेनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लंडनसह साउथ ईस्ट मधील सर्व भागात येत्या 3-डिसेंबर पर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. तर मूळ कोरोनापेक्षा हा नवा विषाणू सर्वाधिक वेगाने पसरणारा स्ट्रेन असल्याचे बोलले जात आहे.(COVID 19 Vaccination in Israel: इस्त्राईल मध्ये PM Benjamin Netanyahu यांना पहिली कोविड 19 लस देत देशभरात लसीकरणाला सुरूवात)
या नव्या कोरोना व्हायरसमुळे सरकारने रहिवाशी परिसरात पोलीस तैनात केले आहेत. त्याचसोबत रेल्वे स्थानकात ही पोलीस कार्यरत असणार आहेत. ब्रिटेनच्या एका न्यूज चॅनलसोबत बोलताना हॅनकॉक यांनी असे म्हटले आहे की, देशात कोरोना संक्रमितांचा आकडा वाढला आहे. त्यामुळे कोरोनाची लस येई पर्यंत परिस्थिती नियंत्रणात ठेवणे मुश्किल आहे.