सीओव्हीआयडी-19 (COVID-19) म्हणजेच कोरोना व्हायरस (Coronavirus) नियंत्रणात आणण्यासाठी आता सोशल मीडिया कंपनी फेसबुक (Facebook) हीसुद्धा मैदानात उतरली आहे. जगभरातील अनेक देशांनी कंपन्यांना 'वर्क फ्रॉम होम' (Work From Home) ही संकल्पना राबविण्यास सांगितले आहे. फेसबुक कंपनीचेही पूर्णवेळ असलेले सुमारे 45,000 हजार कर्मचारी घरुन काम करत आहेत. घरुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी फेसबुकने 74,000 रुपये इतका बोनस देणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, फेसबुक कंपनीत कंत्राटी कर्मचारीही कार्यरत आहेत.
फेसबुक कंपनी सीईए मार्क जुकरबर्ग (Facebook CEO Mark Zuckerberg) यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या एका संदेशात ही घोषणा केली आहे. या सोबतच कोरोना व्हायरसचा सामना करणाऱ्या जगभरातील सुमारे 30 देशांतील 30 हजार छोट्या व्यावसायिकांनाही 7,41 कोटी रुपयांची रोख आणि क्रेडीट मदत देण्याची सेवाही दिली जाणार असल्याचे जुकेरबर्ग यांनी म्हटले आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कंपनीने सॉफ्टवेयर डेवलपर्स कॉन्फरन्ससुद्धा रद्द केली आहे.
दरम्यान, केवळ फेसबुकच नव्हे तर इतर आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देऊ केला आहे. वर्ड डे नावाच्या एका सॉफ्टवेयर कंपनीनेही घोषणा केली आहे की, ते दोन आठवड्यांचा पगा अतिरिक्त सॅलरी बोनस म्हणून कर्मचाऱ्यांना देणार आहेत. जगभरातील एकूण विचार करता आतापर्यंत 7,500 नागरिकांचा मृत्यू कोरोना व्हायरसमुळे झाला आहे. तर, जगभरातील 1,85,000 नागरिकांना कोरोना व्हायरसचे संक्रमण झाले आहे. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी हा दावा केला आहे. (हेही वाचा, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ई-कॉमर्स कंपन्यांना सुगीचे दिवस; Amazon देणार एक लाख लोकांना नोकऱ्या)
मार्क जुकेरबर्ग फेसबुक पोस्ट
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आज मितीला देशात कोरोना व्हायरस लागण झालेल्या रुग्णांची संख्या 147 इतकी आहे. तर, देशभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 03 इतकी आहे. देशभरात कोरोना व्हायरसची लागण झालेले सर्व रुग्ण हे एक तर विदेशातून आले आहेत. किंवा विदेशातून आलेल्या आणि कोरोना बाधित असलेल्या रुग्णांच्या संपर्कात आले आहेत.