प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: BussinessSuiteOnline.com)

कोरोना विषाणूची (Corona Virus) भीती जगभर पसरली आहे. या भीतीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला संकटाचा सामना करावा लागत आहे. जगातील मोठी अर्थव्यवस्था असलेले सर्व देश येऊ घातलेल्या परिस्थितीतबद्दल सांशक आहेत. जागतिक अर्थव्यवस्था संकटात असताना, ई-कॉमर्स (E-Commerce) कंपन्यांना सुगीचे दिवस आल्याचे दिसत आहे. सध्या जगातील अनेक देशांत लॉकडाऊनची परिस्थिती असल्याने, सरकारने लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. अशा परिस्थितीत लोक आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी ऑनलाइन ऑर्डरचा अवलंब करीत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता ई-कॉमर्स कंपनी Amazon ने एक लाख लोकांना नोकऱ्या उपमाब्ध करून देण्याचा विचार केला आहे.

Amazon च्या वतीने सांगण्यात आले आहे की, अमेरिकेत त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात ऑर्डर प्रलंबित असल्याने, त्या पूर्ण करण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत आम्ही ग्राहकांच्या ऑर्डर पूर्ण करण्यासाठी एक लाख लोकांना कामावर घेत आहोत. हे कर्मचारी Amazon चे गोदाम आणि वितरणसाठी काम करतील. अ‍ॅमेझॉनच्या म्हणण्यानुसार, सध्या लोकांना घराबाहेर पडायचे नाही म्हणूनच ई-कॉमर्स कंपन्यांचा आधार घेतला जात आहे.

या कारणामुळे सध्या अपेक्षेपेक्षा जास्त ऑर्डर प्राप्त होत आहेत. या ऑर्डर पूर्ण करण्यासाठी कंपनीकडे पुरेसे मनुष्यबळ नाही, म्हणूनच कंपनी 1 लाख लोकांना कामावर घेणार आहे. Amazon च्या म्हणण्यानुसार, कर्मचार्‍यांना तासाला 2 ते 15 डॉलर्स दिले जातील. अ‍ॅमेझॉनप्रमाणेच अमेरिकेच्या अन्य सुपर मार्केट्स Albertsons, Kroger आणि Raley's यांनाही त्यांच्या ऑर्डरची पूर्तता करण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी भाड्याने घ्यावे लागले आहेत. (हेही वाचा: दक्षिण कोरिया: चर्चमधील पवित्र पाणी प्यायल्याने 46 जणांना झाली कोरोनाची लागण)

अमेरिकेची सर्वात मोठी शिपिंग कंपनी, युनायटेड पार्सल यांनी सांगितले की, सरकारचे निर्बंध असूनही आम्ही लोकांपर्यंत त्यांचे सामान पोहोचण्यासाठी सातत्याने काम करीत आहोत. आम्ही रस्ते आणि हवाई मार्गाने हे काम करत आहोत. दरम्यान, जगभरातील 100 हून अधिक देशांमध्ये कोरोना विषाणूचे संकट ओढवले आहे. आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था तसेच भारतीय अर्थव्यवस्थेवरही त्याची सावली गडद होताना दिसत आहे. हा रोग जगभरातील सरकारांसाठी एक मोठा सामाजिक आव्हान बनला आहे.