काँगोमधील (Congo) लष्करी न्यायालयाने कसाई प्रांतातील (Kasai Region) संयुक्त राष्ट्रांचे तपास अधिकारी मायकेल शार्प (Michael Sharp) आणि जैदा कॅटलान (Zaida Catalán) यांच्या हत्येच्या सुमारे पाच वर्षांनंतर, 51 जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. बुचर ऑक्सीडेंटल मिलिटरी कोर्टाचे अध्यक्ष ब्रिगेडियर जनरल जीन पॉलीन न्श्योकोलो यांनी शनिवारी सांगितले की, प्रकरणातील 54 आरोपींपैकी एका अधिकाऱ्याला आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे आणि इतर दोघांना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. मृत्युदंडाची शिक्षा झालेल्यांना जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागेल, कारण काँगोने 2003 पासून फाशीच्या शिक्षेवर बंदी घातली आहे.
अमेरिकेचे मायकेल शार्प आणि स्वीडनचे जैदा कॅटलान यांना 12 मार्च 2017 रोजी कासाई सेंट्रल प्रांतात मारले गेले, जेव्हा ते या प्रदेशात मिलिशियाच्या प्रतिनिधींसोबत दौऱ्यावर होते. हे दोघे संयुक्त राष्ट्र तज्ज्ञ सुरक्षा परिषदेच्या वतीने कसाईमधील हिंसाचाराची चौकशी करत होते. हे खून प्रकरण त्यावेळी खूप चर्चेत होते. ते बेपत्ता झाल्यानंतर 16 दिवसांनी 28 मार्च 2017 रोजी त्यांचे मृतदेह गावात सापडले. कॅटलानचा शिरच्छेद करण्यात आला होता.
हत्येप्रकरणी चार वर्षांहून अधिक काळ अनेक लोकांवर खटले सुरु होते तरीही या प्रकरणाविषयीचे महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरीत राहिले आहेत. खटल्यादरम्यान, सरकारी वकिलांनी असे सुचवले की, मिलिशियाने ही हत्या संयुक्त राष्ट्रांविरुद्ध बदला घेण्यासाठी केली होती. या स्थानिक लोकांवर सैन्याद्वारे होणारे हल्ले रोखण्यात युएन अपयशी ठरल्याचा आरोप केला होता.
2016 मध्ये कसाई प्रदेशात अशांतता पसरली होती, ज्यामुळे सुरक्षा दलांनी स्थानिक नेता कामुइना न्सापू (Kamuina Nsapu) ला मारले होते. त्यानंतर सरकार आणि स्थानिक लोकांमधील संघर्ष अजूनच वाढला. 2017 च्या मध्यात संघर्ष संपुष्टात येण्यापूर्वी सुमारे 3,400 लोक मारले गेले आणि हजारो लोकांनी आपली घरे सोडून पलायन केले. (हेही वाचा: Canada: कॅनडाचे पंतप्रधान Justin Trudeau कुटुंबासह गुप्त स्थानी स्थलांतरित; देशात अनेक ठिकाणी निदर्शने, जाणून घ्या कारण)
दरम्यान, 2021 मध्ये देखील, काँगोमधील इटालियन राजदूत, एक इटालियन पोलीस अधिकारी आणि त्याच्या ड्रायव्हरवर हल्लेखोरांनी हल्ला केला होता, ज्यात तिघेही ठार झाले. युनायटेड नेशन्स फूड प्रोग्राम (WFP) ने एका निवेदनात म्हटले आहे की काँगोच्या पूर्वेकडील प्रदेशाची राजधानी गोमा येथून रुत्शुरू येथील जागतिक अन्न कार्यक्रम शाळेच्या अन्न प्रकल्पाकडे जात असताना ताफ्यावर हल्ला करण्यात आला. 2017 पासून काँगोमध्ये इटालियन राजदूत म्हणून काम करणारे लुका अटानासिओ आणि इटालियन पोलीस अधिकारी व्हिटोरियो आयकोव्हाकी आणि त्यांचा ड्रायव्हर या हल्ल्यात ठार झाले, तर काफिल्यातील इतर दोन जण जखमी झाले.