
अमेरिकेच्या विज्ञान जर्नल पीएनएएस मध्ये सोमवारी प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार चीनमधील संशोधकांना स्वाइन फ्लूचा (Swine Flu) एक नवीन प्रकार सापडला आहे जो अन्य एक जागतिक महामारी (Global Pandemic) निर्माण करण्यास सक्षम आहे. G4 असे या रोगाचे नाव असून, हे H1N1 या स्वाईन फ्लू च्या 2009 मधील रोगाचे अंश या व्हायरस मध्ये आहेत. चिनी अभ्यासकांच्या माहितीनुसार, हे विषाणू मानवी शरीरात पसरून आजार निर्माण करण्यास सक्षम आहेत. या निकषांपर्यंत पोहचण्यासाठी चीन मध्ये 2011 ते 2018 पर्यंत डुकरांमधील जवळपास 30 हजार स्वॅब नमुने जमा करण्यात आले होते. यामद्ये 179 नमुन्यात स्वाईन फ्लूचे विषाणू आढळून आले होते. मुख्यतः 2016 मध्ये अनेक डुकरांमध्ये हे विषाणू अधिक प्रमाणात आढळले होते.
स्वॅब नमुने गोळा केल्यावर अभ्यासकांनी फेरेट्स वर अनेक प्रकारचे प्रयोग करून पाहिले होते, हे प्राणी मानवी शरीराप्रमाणेच या विषाणूला रिऍक्ट होऊ शकत असल्याने त्यांना निवडले होते. या प्राण्यांमध्ये या विषाणूची लागण झाल्यावर अति ताप, खोकला, शिंका असे सगळे परिणाम दिसून आले. इतकंच नाही तर हा विषाणू एका प्राण्यापासून दुसऱ्या प्राण्यात पसरण्याची गती सुद्धा जास्त होती. या अभ्यासात हेच सिद्ध झाले की, G4 हा संसर्गजन्य रोग वेगाने पसरण्यास सक्षम आहे ज्याचा प्रभाव मानवी शरीरात सुद्धा होऊ शकतो.
दरम्यान, अभ्यासकांनी हे सुद्धा सांगितले की, अन्य कोणत्याही फ्लू मध्ये मानवी शरीरात निर्माण होणारी रोगप्रतिकारक शक्ती ही जी4 या विषाणूला संपवू शकत नाही. रक्तचाचण्यांनुसार, विषाणूची बाधा झालेल्यांमधील अँटीबॉडीज या डुकरांसोबत काम करणाऱ्या 10.4 टक्के लोकांमध्ये दिसून आल्या आहेत. यापूर्वी हा निशाणी प्राण्यांमधून माणसांमध्ये पोचल्याचे पुरावे आहेत मात्र आता माणसांमधून माणसांपर्यंत हा विषाणू पोहचू शकत असल्याचे सिद्ध झालेले नाही. मुळात हीच मुख्य काळजी असल्याचेही अभ्यासकांनी म्हंटले आहे.
केंब्रिज विद्यापीठातील पशुवैद्यकीय औषध विभागाचे प्रमुख जेम्स वुड यांनी सध्या डुकरांसोबत काम करणार्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची सूचना केली आहे.