Botox Treatment: आता पुतीन चेहऱ्यासाठी वापरू शकणार नाहीत 'बोटॉक्स'; सौंदर्यविषयक उत्पादनांचे रशियामधील ऑपरेशन्स निलंबित
Vladimir Putin (संग्रहित संपादित प्रतिमा)

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांचा (Russia-Ukraine War) संपूर्ण जगावर परिणाम होत आहे. रशियाला वारंवार ताकीद देऊनही पुतीन मागे हटायला तयार नाहीत, अशात रशियाला अद्दल घडवण्यासाठी अनेक देशांनी रशियावर निर्बंध घालायला सुरुवात केली आहे. रशियावर पश्चिमेकडील देशांनी लादलेल्या निर्बंधांचा थेट परिणाम राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्यावर झाला आहे. एका अहवालात नमूद केले आहे की, या निर्बंधांमुळे पुतीन बोटॉक्स (Botox) वापरू शकणार नाहीत. काही औषध कंपन्यांनी घातलेल्या निर्बंधांमुळे हे घडले आहे.

या कंपन्यांमध्ये एली लिली आणि कंपनी (Eli Lilly and Co), नोव्हार्टिस (Novartis) आणि एबीवी इंक (Abbvie Inc) यांचा समावेश आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार गेल्या आठवड्यात या औषध कंपन्यांनी सांगितले की, ते रशियाला फक्त कर्करोग आणि मधुमेहावरील उपचारांसाठी गंभीर औषधे पुरवठा करणे सुरू ठेवतील, परंतु ‘अनावश्यक’ उत्पादने थांबवतील.

द इंडिपेंडंटच्या म्हणण्यानुसार, एबीवी इंक सुरकुत्यावरील उपचार उत्पादन बोटॉक्सची निर्मिती करते. कंपनीने सांगितले आहे की, त्यांनी रशियामधील त्यांच्या सर्व सौंदर्यविषयक उत्पादनांसाठी ऑपरेशन्स तात्पुरते निलंबित केले आहेत. त्यामुळे रशियामधील लोक बोटॉक्स वापरू शकणार नाहीत, परिणामी पुतीनदेखील आपल्या देशात हे उत्पादन वापरू शकणार नाहीत. (हेही वाचा: Russia-Ukraine War: रशिया युक्रेन युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर संकट, कृषी उत्पादनांसह, खाद्य तेल आणि इंधनही महागण्याची शक्यता)

द डेली बीस्ट आणि द गार्डियन यासह अनेक माध्यमांनी पुतिन यांनी बोटॉक्सचा वापर करत असल्याचे म्हटले आहे. 10 वर्षे जुन्या लेखात, द गार्डियनने पुतिन यांच्या बोटॉक्सच्या वापराबाबत रशियामध्ये फिरत असलेल्या अहवालांचा उल्लेख केला आहे. द गार्डियनने म्हटले आहे की, पुतिन यांच्या बोटॉक्स वापराविषयी अफवा ऑक्टोबर 2011 मध्ये पसरल्या. त्यावेळी रशियाचे पंतप्रधान म्हणून ते कीवला गेल्यानंतर जिथे त्यांच्या डोळ्याभोवती निळ्या-पिवळ्या जखमा दिसून आल्या होत्या.

पुतीन यांचे वय सध्या एकोणसत्तर आहे, अशात अजूनही त्यांचे कपाळ  गुळगुळीत आहे, गाल गुलाबी आहेत, डोळ्यांखाली सुरकुत्या नाहीत. त्यावरून अनेक दावे केले आहेत की, पुतीन यांनी बोटॉक्ससह अनेक कॉस्मेटिक प्रक्रिया केल्या आहेत. नुकतेच एका ऑस्ट्रेलियन डॉक्टरने दावा केला की, पुतीन यांनी मोठ्या प्रमाणावर फिलरचा वापर केला आहे. परंतु अशा अनेक वर्षांपासून फिरत असलेल्या अफवांवर पुतीन किंवा रशिया यापैकी कोणीही अधिकृतपणे भाष्य केलेले नाही.