प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

पाकिस्तानच्या (Pakistan) टेलिकम्युनिकेशन अथॉरिटीने (PTA) मंगळवारी टिंडर (Tinder) सह पाच डेटिंग अ‍ॅप्स आणि लाइव्ह स्ट्रीमिंग अ‍ॅप्सवर बंदी घातली. या प्लॅटफॉर्मवर अश्लील/असभ्य कंटेंट (Immoral Content) दाखवला जात असल्याचा आरोप केला जात आहे. पीटीएने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अयोग्य सामग्री काढून टाकण्यात अपयशी ठरल्यानंतर टिंडर, टॅग्ड (Tagged), स्काऊट (Skout), गे डेटिंग अ‍ॅप ग्रांयडर (Grindr) आणि सेहाय (SayHi) या अ‍ॅप्सवर कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या स्थानिक कायद्यांनुसार या अ‍ॅप्सना ‘डेटिंग सर्विस’ आणि लाईव्ह स्ट्रीमिंग कंटेट काढून टाकण्यास सांगितले होते, परंतु त्या चेतावणीकडे दुर्लक्ष केले गेले.

पीटीएने सांगितले आहे की, या प्लॅटफॉर्मनी निर्धारित कालावधीत नोटिसांना प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे हे अॅप्स ब्लॉक करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, कंपन्यांनी देशातील कायद्यांचे पालन केले आणि अश्लील कंटेंट काढून टाकल्यास या बंदीचा पुनर्विचार केला जाईल.

याबाबत जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘पीटीएने 5 डेटिंग/लाइव्ह स्ट्रीमिंग अ‍ॅप्लिकेशन्स बंद केली आहेत. यामध्ये , टॅग्ड, स्काऊट, ग्रांयडर आणि से हाय यांचा समावेश आहे. अशा अ‍ॅप्लिकेशन्सवरील नको असलेला कंटेंट पाहून व त्याच्या होणाऱ्या नकारात्मक प्रभावाचा विचार करून, पीटीएने वरील नमूद केलेल्या व्यवस्थापनांना नोटिसा बजावल्या आहेत. पाकिस्तानच्या स्थानिक कायद्यानुसार असा कंटेंट काढून टाकण्याचा त्यांना आदेश दिला होता. मात्र प्लॅटफॉर्मने नोटिसाला निर्धारित मुदतीत प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे प्राधिकरणाने हे अ‍ॅप्स बंद करण्याचा निर्णय घेतला.’ (हेही वाचा: पुण्यात Gay App च्या माध्यमातून समलैंगिक संबंध ठेवण्यास गेलेल्या तरुणाला लुटण्याचा प्रकार; तलवारीच्या धाकाने 81 हजार लुबाडले)

दरम्यान, पीटीए नेहमीच अश्लील कंटेंट दाखवल्याविरोधात अशा साइटवर कारवाई करते. हे अ‍ॅप्स आणि वेबसाइटच्या विरोधात लोकांद्वारे केलेल्या तक्रारींचे निवारणही पीटीए करते. दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी लाईव्ह स्ट्रीमिंग अ‍ॅप बिगोवर बंदी घातली होती. यासोबतच टिक-टॉकला देखील अश्लील सामग्रीबद्दल अंतिम चेतावणी देण्यात आली होती.