प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

सध्या स्ट्रेट लोकांसाठी लैंगिक संबंध, मैत्री, नाते अशा गरजा ओळखून अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. आता गेल्या काही वर्षांपासून समलैंगिक (Gay) लोकांसाठीही काही खास अॅप्स (App) बाजारात आली आहेत. मात्र अशा अॅप्सच्या माध्यमातून अनेक अनुचित प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा अॅप्सच्या माध्यमातून लोकांना फसवून त्यांना लुटण्याचे प्रकार राजधानी दिल्लीत घडल्याचे समोर आले होते. आता असाच प्रकार पुण्यातही (Pune) घडला आहे. अशा अॅपच्या माध्यमातून ओळख झालेल्या तरुणासोबत समलैंगिक संबंध ठेवण्यास गेलेल्या विवाहित तरुणाला मारहाण करुन, त्याच्याकडील 81 हजाराचा ऐवज लुटला गेला आहे.

याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी एका गे अ‍ॅपवर सक्रीय असताना, त्याला रवी नावाच्या मुलाचा मेसेज आला. दोघांमध्ये बोलणे झाले व त्यांनी लैंगिक संबंधासाठी भेटण्याचे ठरवले. रवीने फिर्यादीला डीएसके रोडजवळ एक जागा असल्याचे सांगितले. 9 ऑगस्ट रोजी सकाळी फिर्यादी त्या ठिकाणी गेला. एका खोलीमध्ये त्याला रवी भेटला, रवी व त्याच्यामध्ये पुढे काही होणार इतक्यात त्या खोलीमध्ये तीन-चार जण तलवार, काठ्या घेऊन आले. त्यांनी फिर्यादीला मारहाण केली व तलवारीच्या धाकाने त्याच्याकढील 10 हजार रुपये, सोन्याच्या दोन अंगठ्या, चांदीच्या दोन अंगठ्या काढून घेतल्या़. (हेही वाचा: 'Apple कंपनीने मला समलैंगिक बनवले'; iPhone मुळे Gay बनलेल्या व्यक्तीने दाखल केला 11 लाखाचा गुन्हा)

इतकेच नाही तर, गुगल पे द्वारे व एटीएमचा पिन नंबर घेऊन त्याद्वारे पैसे काढून घेतले. अशा प्रकारे या तरुणाकडून जवळजवळ 81 हजार लुटले. तरुण विवाहित असल्याने त्याने घाबरून पोलिसांकडे जाणे टाळले. त्यानंतर त्याने एका मित्राला ही गोष्ट सांगितली. मित्राने मानसिक आधार दिल्यानंतर त्याने पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. या प्रकरणामध्ये कट रचून (भादवि कलम 120 ब) मारहाण करून लुटल्याप्रकरणी (भादवि कलम 394) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश उमरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सिंहगड पोलीस ठाणे, यांनी याबाबत माहिती दिली.