Baba Vanga’s Prediction: नेत्रहीन बाबा वंगा यांच्या 2022 मधील 6 पैकी 2 भविष्यवाण्या ठरल्या खऱ्या; जाणून घ्या सविस्तर
Baba Vanga (Photo Credits : Wikimedia )

बल्गेरियातील नेत्रहीन वांगेलिया पांडवा गुश्तेरोवा (Vangeliya Pandeva Gushterova) उर्फ ​​बाबा वंगा फकीर यांच्याबद्दल माहिती नसणारी व्यक्ती क्वचितच आढळेल. बाबा वंगा या एक जगप्रसिद्ध ज्योतिष होत्या. असे म्हणतात की, दृष्टी नसली तरी त्या भविष्यात स्पष्टपणे पाहू शकत होत्या. त्यांची अनेक भाकिते खरी ठरली आहेत. बाबा वंगा यांनी 2022 वर्षासाठी एकूण 6 भाकिते केली होती. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की आतापर्यंत त्यातील 2 खरी ठरली आहेत. यानंतर त्यांचे उर्वरित अंदाजही खरे ठरतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बाबा वंगा यांनी 2022 मध्ये आशियाई देश आणि ऑस्ट्रेलियाच्या काही भागात पूर येण्याची शक्यता वर्तवली होती. यासोबतच भूकंप होईल आणि त्सुनामी येईल असेही सांगण्यात आले होते. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावर कहर झाला आहे. बांगलादेश, भारताचा ईशान्येकडील प्रदेश आणि थायलंडमध्येही पुराचा परिणाम दिसून येत आहे.

याशिवाय बाबा वंगा यांनी अनेक शहरांमध्ये दुष्काळाचे भाकीत केले होते. आता युरोपातील अनेक शहरांमध्ये हे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी तर इंग्लंडमधील तापमान देशाच्या इतिहासात पहिल्यांदा 40 डिग्रीच्या वर गेले होते. पोर्तुगाल आणि इटलीसारख्या देशांनी लोकांना कमी पाणी वापरण्यास सांगितले आहे. 1950 नंतर देशात सर्वात कमी पाऊस पडत आहे. इटलीमध्ये 1950 नंतरचा सर्वात भीषण दुष्काळ आहे. (हेही वाचा: ब्रिटनच्या इतिहासात प्रथमच 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद; रस्ते बंद, रेल्वे आणि उड्डाणेही रद्द होण्याची शक्यता)

बाबा वंगा यांच्या इतर भविष्यवाण्या-

तापमानवाढीमुळे रशियाच्या सायबेरिया भागात बर्फ वितळण्यास सुरुवात होईल, त्यामुळे याठिकाणी शास्त्रज्ञांच्या टीमला प्राणघातक विषाणूचा शोध लागू शकतो.

तापमानात वाढ झाल्यामुळे भारतामधील टोळांचे प्रमाण वाढेल आणि ते शेतातील लाखो पिकांवर हल्ला करून नष्ट करतील.

बाबा वंगा यांच्यामते ‘ओमुआमुआ’ नावाचा एक लघुग्रह एलियनद्वारे पृथ्वी ग्रहावरील जीवनाचा शोध घेण्यासाठी पाठवला जाईल आणि त्याद्वारे एलियन मानवाला कैद करून घेऊन जाऊ शकतात.

याआधी सोव्हिएत युनियनचे विघटन, 9/11 चा दहशतवादी हल्ला, प्रिन्सेस डायनाचा मृत्यू अशा अनेक गोष्टींचे भाकीत बाबा वांगे यांनी केले होते, जे अगदी खरे ठरले. दरम्यान, 1911 मध्ये जन्मलेल्या बाबा वंगा यांची वयाच्या 12 व्या वर्षी दृष्टी गेली. त्यांचे 85 टक्के अंदाज खरे ठरल्याचे सांगण्यात येत आहे. ऑगस्ट 1996 मध्ये बाबा वेंगा यांचे स्तनाच्या कर्करोगाने निधन झाले, परंतु त्यापूर्वी त्यांनी 5079 पर्यंतचे अंदाज वर्तवले होते.