जगातील सर्वात मोठा धर्म म्हणून आज ख्रिश्चन धर्माकडे (Christianity) पहिले जाते. आपल्या धर्माचा प्रसार करण्यासाठी व्हॅटीकन (Vatican) ने जगभरात आपले अनुयायी पाठवले. ख्रिश्चन धर्माचे रक्षण करणे, हा धर्म पुढे चालवणे, लोकांना येशूचा संदेश देणे अशी धर्माशी संबंधित कामे करणारे लोक प्रिस्ट (Priest), फादर, पाद्री अथवा धर्मगुरू म्हणून ओळखले जाऊ लागले.
मात्र अशा पवित्र चर्चमध्ये चक्क लहान मुलांवर लैंगिक अत्याचार होत असल्याच्या धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. हे करणारे दुसरे तिसरे कोणी नसून चक्क धर्मगुरू आहेत हे पाहून हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
रोमन कॅथलिक चर्चच्या (Roman Catholic Church) अल्ट्रा-ऑर्थोडॉक्स मेक्सिकन शाखेशी संबंधित पाद्र्यांवर पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराचा आरोप झाला आहे. या पाद्र्यांनी किमान 175 मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. शनिवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात हा धक्कादायक खुलासा झाला आहे. या अहवालानुसार लीगनरीज ऑफ क्राइस्टचे संस्थापक मार्शल मॅसिएल (Marcial Maciel) यांनी किमान 60 मुलांवर लैंगिक अत्याचार केले आहेत. 1941 पासून, एकूण 33 पाद्री तसेच तरूण पुजारी किशोरवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करीत होते. अहवालात 1941 ते 16 डिसेंबर 2019 पर्यंतच्या प्रकरणांची माहिती देण्यात आली आहे. (हेही वाचा: मदरसामध्ये लहान मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकास अटक; एकेकाळी स्वतःवरही झाले होते अत्याचार)
अशा लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्यांमध्ये बहुतेक 11 ते 16 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांचा समावेश आहे. अहवालात असे म्हटले आहे की, लैंगिक अत्याचार केलेले 33 पैकी 18 पाद्री अद्याप संघटनेचा भाग आहेत, परंतु त्यांना सार्वजनिक किंवा अल्पवयीन मुलांच्या कामापासून दूर केले गेले आहे. अनेक वर्ष लैंगिक अत्याचाराच्या आरोपाचा सामना क्ल्यानंतर पोप बेनेडिक्ट 16 यांनी 2006 मध्ये मॅसिएलला संपूर्ण आयुष्यासाठी प्रार्थना करण्याचा अधिकार नाकारला. 2008 मध्ये मॅसिएलचा मृत्यू झाला.