प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

ऑनलाइन शॉपिंगने (Online Shopping) आपल्या जीवनात मोठी क्रांती घडवली आहे. ऑनलाईन खरेदी सुरु झाल्यापासून अनेक गोष्टी सुखाच्या-सोयीच्या झाल्या आहेत. फक्त एका क्लिकवर तुम्हाला हवे ते सामान घरपोच मिळू शकते. परंतु त्यासोबत काही धोकेही आहेत. न्यूयॉर्कमधील (New York) एका बाळाने आपल्या आईच्या फोनवरून लाखो रुपयांची ऑनलाईन शॉपिंग केली आहे. जेव्हा त्याच्या पालकांना याबाबत समजले तेव्हा त्यांनी डोक्यावर हात मारून घेतला. त्यामुळे मोबाईल आणि टॅब्लेटपासून लहान मुलांना दूर ठेवण्याचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

तर मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय दांपत्य मधु आणि प्रमोद कुमार हे न्यूयॉर्कमध्ये राहतात. त्यांचा जवळपास 2 वर्षांचा मुलगा आहे ज्याचे नाव अयांश. तर अयांशला अजून लिहिता-वाचता येत नाही, परंतु तो ऑनलाइन वस्तू ऑर्डर करण्यास सक्षम आहे. त्याच्या आईने फोनवर एका ऑनलाइन शॉपिंग साइटवरील कार्टमध्ये काही फर्निचरचे सामान घालून ठेवले होते. ते मागवायचे का नाही याबाबत जोडप्याचा अजून विचार झाला नव्हता.

यामध्ये साधारण 1.4 लाख किमतीचे विविध फर्निचर शॉर्टलिस्ट केले होते. परंतु  अयांशने खेळता खेळता आईच्या फोनवरील कार्टमधील सर्व दीड लाख रुपयांचे फर्निचर खरेदी केले व ते त्याच्या घरच्या पत्त्यावर मागवले. जेव्हा त्यांच्या घरी फर्निचरची संपूर्ण डिलिव्हरी सुरू झाली तेव्हा पालकांना ही बाब समजली. त्यानंतर आईने तिचे शॉपिंग खाते तपासले तेव्हा कार्टमधील सर्व सामान ऑर्डर केले असल्याचे दिसून आले.

अयांशने केलेली सर्व ऑर्डर सेटल केल्यानंतर त्याच्या पालकांनी त्यांचे फोन पासवर्ड बदलले. तसेच त्वरीत सुरक्षा सेटिंग्ज वाढवली, जेणेकरून मुलगा फोन सुरु करू शकणार नाही. दरम्यान, लहान मुळे त्यांचे आई-वडील आणि भावंडांच्या स्क्रीन अ‍ॅक्टिव्हिटीवर बारीक नजर ठेवत असतात. NBC च्या रिपोर्टनुसार, लहान मुले यातून स्क्रीन स्वाइप करणे, टॅप करणे अशा गोष्टी शिकतात.