Afghanistan Road Accident (फोटो सौजन्य - X/@MarioNawfal)

Afghanistan Road Accidents: अफगाणिस्तान (Afghanistan) मधून मोठी बातमी समोर येत आहे. पूर्व अफगाणिस्तानच्या गझनी (Ghazni) प्रांतात बुधवारी रात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात (Accident) किमान 44 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 76 जण जखमी झाले आहेत. राजधानी काबूलला दक्षिण कंदाहार प्रांताशी जोडणाऱ्या महामार्गालगत, गझनी शहराच्या बाहेरील भागात आणि प्रांताच्या अंदार जिल्ह्यात हे अपघात झाले. यासंदर्भात माहिती आणि संस्कृतीचे प्रांतीय संचालक मुल्ला हमीदुल्ला नेसार यांनी माहिती दिली आहे.

सर्व जखमींना उपचारासाठी आरोग्य केंद्रात हलवण्यात आले आहे, परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. गझनी प्रांताच्या गव्हर्नरचे प्रवक्ते हाफिज उमर यांनी सांगितले की, बुधवारी रात्री उशिरा काबुल-कंदहार महामार्गावर एक प्रवासी बस आणि तेल टँकरची धडक झाली, तर त्याच महामार्गावरील दुसऱ्या भागात दुसरा अपघात झाला. जखमींना गझनीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचंही उमर यांनी सांगितलं. (हेही वाचा -Mumbai Coastal Road Accident: मुंबई कोस्टल रोडवरील बोगद्यात दोन कारची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत (Watch Video))

जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक -

अपघातातील गंभीर जखमींना काबूलला हलवण्यात आले आहे. या अपघातातील मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी सोमवारी, दक्षिण अफगाणिस्तानच्या हेलमंड प्रांतात एका कुटुंबाला घेऊन जाणारे एक वाहन दरीत कोसळले. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला होता. हा अपघात प्रांतातील बाबाजी जिल्ह्य़ात घडला असून चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार खोल दरीत कोसळली. यात महिला आणि मुलांसह सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.  (हेही वाचा - Neelkamal Boat Accident: गेटवे ऑफ इंडिया जवळ झालेल्या बोट अपघातात 2 जण अद्याप बेपत्ता)

कार नदीत कोसळल्याने सहा प्रवाशांचा मृत्यू -

गेल्या आठवड्यात, उत्तर बदख्शान प्रांतात कार नदीत कोसळल्याने सहा प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. या अपघातात चार जण जखमी झाले होते. या महिन्याच्या सुरुवातीला, उत्तर जॉज्जान प्रांताला शेजारच्या सारी पुल प्रांताशी जोडणाऱ्या महामार्गावर झालेल्या अपघातात एक जणाचा जागीच मृत्यू झाला होता. तसेच 10 जण जखमी झाले होते.