दक्षिण कोरियाने (South Korea) 1 जुलैपासून भारतातून येणाऱ्या लोकांसाठी दोन आठवड्यांचे सक्तीचे क्वारंटाईन (Quarantine) संपवण्याची घोषणा केली आहे. कोव्हिशील्ड (Covishield) लसीचे दोन्ही डोस घेतलेले लोक दक्षिण कोरियामध्ये कुठेही फिरू शकतात असे येथील सरकारचे म्हणणे आहे. मात्र ज्यांनी कोव्हॅक्सिनचा (Covaxin) डोस घेतला आहे त्यांना 2 आठवडे वेगळे राहणे आवश्यक आहे. मात्र हे निर्बंध केवळ सामान्य जनतेसाठी असणार आहेत, देश प्रमुख किंवा उच्च पदावरील लोकांना यातून सूट देण्यात आली आहे. दक्षिण कोरियाचे भारतातील दूत शिन बोंग-किल (Shin Bong-Kil) यांनी याबाबत माहिती दिली.
ते पुढे म्हणाले की, दक्षिण कोरियन सरकारने दोन आठवड्यांचा क्वारंटाईनचा नियम मागे घेतले आहे. परंतु या नियमामधून फक्त अशा लोकांनाच सूट देण्यात आली आहे ज्यांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. यामध्ये भारतामधून येणाऱ्या कोव्हिशील्ड लस घेतलेल्या लोकांना सूट दिली आहे, मात्र ज्यांनी कोव्हॅक्सिन लस घेतली आहे त्यांना 14 दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल.
त्यांनी असेही सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोव्हॅक्सिन घेतली आहे मात्र त्यांना जर का कोरियाला भेट द्यायची असेल तर ते क्वारंटाईनशिवाय देशात येऊ शकतात. तसेच इतर उच्चपदस्थ अधिकारी, उदाहरणार्थ- सेना प्रमुख कोरियाला भेट देत असतील तर त्यांनाही वेगळे राहण्याची गरज नाही. (हेही वाचा: China मध्ये 3 वर्षांवरील मुलांसाठी CoronaVac कोविड-19 लसीला मंजूरी)
याशिवाय शिन बोंग-किल यांनी शेजारच्या देशांना मोफत लस देण्याच्या निर्णयाबद्दल भारताचे कौतुक केले. ते म्हणाले की, भारताकडून घडलेली ही मोठी कृती आहे. जर भारताने या देशांना मदत केली नसती तर भूतान, नेपाळ, श्रीलंका, मालदीव यांसारख्या देशांच्या मदतीला कोण पुढे असले कोणास ठाऊक. अशीच एकमेकांना मदत केली पाहिजे.