Mark Zuckerberg (Photo credit - PTI)

Mark Zuckerberg On WhatsApp Pay: व्हॉट्सअॅप युजर्सला आता फेसबुकच्या मालकीच्या मेसेजिंग अॅपवरून म्हणजेच व्हॉट्सअॅपवरुन (Whatsapp) पैसे ट्रान्सफर करता येणार आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) व्हॉट्सअ‍ॅपला भारतात यूपीआय (UPI) आधारित पेमेंट सेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर फेसबुकचे सीईओ (Facebook CEO) मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात बोलताना मार्क झुकरबर्ग म्हणाले की, 'WhatsApp च्या माध्यमातून पैले ट्रान्सफर करण्यासाठी 140 हून अधिक बँकांनी पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे आपण संदेशाप्रमाणेचं अगदी सहजपणे व्हॉट्सअ‍ॅपवरुन आपल्या मित्रांना आणि कुटूबियांना पैसे पाठवू शकता. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या सेवेसाठी 140 हून अधिक बँकांनी पाठिंबा दर्शविला आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरून पैसे पाठवणे अगदी सोपे आणि सुरक्षित आहे,' असंही झुकरबर्ग यांनी नमूद केलं आहे.

व्हॉट्सअॅपने या सेवेसाठी आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि जिओ पेमेंट्स बँक या 5 भारतीय बँकांशी भागीदारी केली आहे. या पाच प्रमुख बँकांनी व्हॉट्सअॅपसोबत भागीदारी केल्याबद्दल आम्हाला आनंद झाला आहे. या सेवेमुळे यूजर्स UPI च्या आधारे व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पैसे पाठवू शकतात, असं व्हॉट्सअॅपने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे. (हेही वाचा - WhatsApp Pay म्हणजे काय? या नव्या फिचरचा वापर करुन पैशांची देवाण-घेवाण कशी कराल? जाणून घ्या)

झुकरबर्ग पुढे म्हणाले की, व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट्स सुविधा 10 भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असेल. यासाठी आपल्याला फक्त यूपीआयला समर्थन देणाऱ्या डेबिट कार्डची आवश्यकता आहे. त्यामुळे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने व्हॉट्सअॅपवरून पैसे पाठवू शकता. व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन अपडटेमध्ये तुम्हाला ही सुविधा उपलब्ध असेल, असंही त्यांनी सांगितलं. (वाचा - आता WhatsApp च्या माध्यमातून Transfer करू शकाल पैसे; NPCI ने दिली परवानगी)

दरम्यान, आम्ही राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (National Payments Corporation of India) बरोबर काम करीत आहोत. ते सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे. आम्ही हे भारताचे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस वापरुन तयार केले आहे. ज्यामुळे कोणालाही त्वरित पैसे पाठवणे सोपे होईल. हे अॅप लोकांना उत्कृष्ट सेवा प्रदान करण्यासाठी सक्षम आणि सुरक्षित असेल, असा विश्वासदेखील मार्क झुकरबर्ग यांनी व्यक्त केला आहे.

पेमेंटसाठी व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना प्रत्येक व्यवहारासाठी वैयक्तिक यूपीआय पिन प्रविष्ट करावा लागेल. व्हॉट्सअ‍ॅपवरून करण्यात येणारे व्यवहार अत्यंत सुरक्षित आणि गोपनीय असणार आहेत, असंही व्हॉट्सअॅपने म्हटलं आहे. या नव्या सुविधेमुळे व्हॉट्सअॅपच्या युजर्समध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.