चॅट बारमधून पेमेंट त्वरीत पाठवण्यासाठी नवीन पेमेंट चॅट शॉर्टकट (Payment Chat Shortcut) चालू केल्यानंतर फेसबुकच्या (Facebook) मालकीचे व्हॉट्सअॅप (WhatsApp) भारतीय युजर्ससाठी "कॅशबॅक" (Cashback) फिचरवर काम करत आहे. WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअप पेमेंट (WhatsApp Payment) चा वापर केल्याच्या 48 तासानंतर युजर्सला कॅशबॅक मिळेल. (WhatsApp नवे फिचर्स आणण्याची शक्यता, युजर्सला ग्रुप कॉल शर्टकट सोबत इतरही अनेक पर्याय मिळण्याची शक्यता)
आपल्या युजर्सना व्हॉट्सअॅप पेमेंट्स वापरण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी कंपनी कॅशबॅक फिचर आणत आहे. व्हॉट्सअॅप पेमेंट्स हा पैसे पाठवण्याचा एक सुरक्षित आणि सोपा मार्ग असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. प्रत्येक युजर्सला कॅशबॅक मिळेल. विशेष म्हणजे ज्या युजर्सनी व्हॉट्सअॅपवर कधीही पैसे पाठवले नाहीत अशा युजर्संना देखील कॅशबॅक मिळेल हे अद्याप स्पष्ट नाही. हे फिचर चालू केल्यानंतर कंपनी याचे स्पष्टीकरण देईल.
हे फिचर भारतातील युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) पेमेंट पर्यंत मर्यादीत आहे, युजर्स फक्त एक कॅशबॅक मिळवू शकतात आणि पेमेंटसाठी तुम्हाला 10 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो, असे अहवालात म्हटले आहे. कॅशबॅक मध्ये मिळणारी रक्कम पुढे बदलण्याची शक्यता आहे.
अलीकडेच, इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मने भारतातील पेमेंट सेवा बळकट करण्यासाठी प्लॅटफॉर्मवर पेमेंट्स बॅकग्राउंड फिचर सादर केले होते. UPI वर आधारित असलेले हे फिचर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या भागीदारीत तयार केले होते. व्हॉट्सअॅपवरील पेमेंट फिचर 227 पेक्षा जास्त बँकांमध्ये व्यवहार करण्यास सक्षम आहे. एवढ्या बँकासोबत व्यवहार करणारे हे भारतातील पहिले फिचर आहे. दरम्यान, व्हॉट्सअॅप नेहमीच नवनवे फिचर्स युजर्सच्या भेटीला आणत असतं.