अग्नि -2 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची पहिली रात्र चाचणी यशस्वी; न्युक्लिअर मिसाईलसह 2000 कि.मी.पर्यंत करू शकते हल्ला
Agni-II Ballistic Missile (Photo Credit : Twitter)

भारताने 2 हजार किलोमीटर अंतरावर हल्ला करणाऱ्या अग्नि -2 या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची (Agni-II Ballistic Missile) यशस्वी चाचणी केली आहे. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडद्वारे ओडिशातील बालासोर येथे रात्री या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी प्रथमच याचे परीक्षण करण्यात आले आहे. या क्षेपणास्त्रामध्ये 2000 किलोमीटरपर्यंत धावण्याची क्षमता आहे. त्याची मारण्याची क्षमता देखील 3 हजार किमीपर्यंत वाढवता येऊ शकते. तसेच हे क्षेपणास्त्र अण्वस्त्रे बाळगण्यासही सक्षम आहे. अग्नि -2 क्षेपणास्त्र 1 टन पर्यंत न्यूक्लिअर वॉरहेड बाळगण्यास सक्षम आहे.

जमिनीवरुन जमिनीवर आदळणारे अग्नि क्षेपणास्त्र 2004 मध्येच सैन्यात दाखल करण्यात आले आहे. वृत्तानुसार, 20 मीटर लांबीचे हे क्षेपणास्त्र डीआरडीओच्या प्रगत सिस्टम प्रयोगशाळेने तयार केले आहे. अग्नि एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांतर्गत विकसित केले गेले आहे. याची खासियत म्हणजे हे दोन स्टेजचे मिसायल घन इंधनद्वारे चालविला जाईल. अग्नि क्षेपणास्त्राची लांबी 20 मीटर आहे. वारहेड: 1000 किलो वाहून नेण्यास ते सक्षम आहे. अग्नि क्षेपणास्त्र 2000 किमीपर्यंत मारण्यास सक्षम आहे. त्यात अचूक लक्ष्य गाठण्यासाठी उच्च अचूकता नेव्हिगेशन सिस्टम आहे. (हेही वाचा: ISRO कडून Chandrayaan-3 च्या मोहिमेची तयारी सुरु)

असे सांगितले जात आहे की, अग्नि -2 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी मागील वर्षी यशस्वीरित्या पूर्ण झाली होती, परंतु यावेळी रात्रीच्या प्रक्षेपणासाठी त्याची चाचणी प्रथमच यशस्वीरित्या पार पडली. डीआरडीओच्या सूत्रांनी सांगितले की, चाचणीच्या संपूर्ण मार्गावर अत्याधुनिक रडार, टेलिमेटरी मॉनिटरींग सेंटर, इलेक्ट्रो-ऑप्टिक उपकरणे आणि दोन नौदल वाहिन्यांद्वारे हे यशस्वी परीक्षण केले गेले आहे.