Babies With Sperm-Injecting Robot: जगात पहिल्यांदाच चक्क रोबोटच्या मदतीने झाला बाळांचा जन्म; वैद्यकीय क्षेत्रातील मोठे यश
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : You Tube)

जसे जसे तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती होत आहे, तस तसे विज्ञान, वैद्यकीय क्षेत्रातही अनेक मोठे बदल होत आहेत. आता पहिल्यांदाच रोबोटच्या मदतीने दोन बाळांचा जन्म झाला आहे. या घटनेमुळे वैद्यकीय विश्वही आश्चर्यचकित झाले आहे. या प्रकरणात रोबोटने थेट नाही तर अप्रत्यक्षपणे बाळांना जन्म दिला आहे.

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, रोबोटिक सुईच्या (Robotic Needle) मदतीने शुक्राणूंना (Sperm Cells) मानवी अंड्यामध्ये इंजेक्ट करण्यात आले आहे. त्यानंतर भ्रूण विकसित झाला आणि आता त्यातून दोन मुले जन्माला आली आहेत, ज्या दोन्ही मुली आहेत. या नव्या तंत्रज्ञानामुळे आयव्हीएफचा खर्चही बऱ्याच अंशी कमी होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या आयव्हीएफसाठी प्रशिक्षित भ्रूणशास्त्रज्ञांची गरज आहे, त्यांच्या मदतीने गर्भधारणा केली जाते, परंतु या रोबोटिक सुईमुळे त्यांची गरज भासणार नाही.

एमआयटी टेक्नॉलॉजी रिव्ह्यूनुसार, स्पॅनिश अभियंत्यांच्या टीमने न्यूयॉर्क शहरातील न्यू होप फर्टिलिटी सेंटरमध्ये शुक्राणू पेशींचे मानवी अंडांमध्ये रोपण करण्यासाठी रोबोटिक सुईचा वापर केला. या प्रक्रियेतून दोन निरोगी भ्रूण तयार झाले ज्यातून दोन मुलींचा जन्म झाला. अहवालानुसार, जगातील या पहिल्या गर्भाधान रोबोटवर काम करणाऱ्या अभियंत्यांमध्ये एक असाही होता ज्याला प्रजननक्षमतेच्या औषधाबद्दल फारशी माहिती नव्हती. परंतु या प्रक्रियेदरम्यान त्याने व्हिडिओ गेमच्या रिमोटचा विशेष वापर केला, त्यामुळे त्याचे योगदानही महत्त्वाचे आहे. (हेही वाचा: चंद्राच्या मातीतून तयार करता येणार ऑक्सिजन? NASA च्या शास्त्रज्ञांना सापडला मार्ग, मानववस्तीचे स्वप्न होऊ शकते पूर्ण)

अहवालात सांगण्यात आले की, सोनी प्लेस्टेशन 5 च्या कंट्रोलरमधून ही रोबोटिक सुई योग्य स्थितीत ठेवण्यात आली होती आणि कॅमेऱ्याच्या मदतीने मानवी अंड्याचे निरीक्षण करण्यात आले. ही सुई स्वतःहून पुढे सरकली आणि अंड्याच्या आत शिरली. त्यानंतर त्याने एकच शुक्राणू पेशी अंड्याच्या आत सोडली. अशाप्रकारे या दोन मुली रोबोटद्वारे गर्भधारणेचा पहिला नमुना आहेत. ओव्हरचर लाइफ नावाच्या स्टार्टअपने या रोबोटिक सुईचा शोध लावला आहे.