PUBG प्रेमींसाठी खुशखबर! 'पबजी मोबाईल' गेम भारतात कमबॅक करण्याची शक्यता
PUBG | Image used for representational purpose only | (Photo Credits: Flickr)

भारतात पबजी मोबाईल (PUBG Mobile) गेमवर घालण्यात आलेली बंदी अनेक पजबीप्रेमींच्या जिव्हारी लागली होती. बंदी घातल्यानंतरही युजर्स गेम्स खेळू शकत होते. मात्र टेंन्सेन्ट गेम्सने (Tencent Games) आपले इंडिया सर्व्हर कटऑफ केल्यानंतर पबजी गेम पूर्णपणे बंद झाला. परंतु, आता पबजी गेम भारतात पुन्हा दाखल होणार असल्याची माहिती काही रिपोर्ट्समधून समोर आली आहे. दरम्यान, पबजीकडून या बातमीला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.

पबजी मोबाईल गेम या वर्षाअखेरच्या आत भारतात दाखल होईल, असे TechCrunch ने खात्रीशीर सुत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे. भारतीय युजर्सचा डेटा स्टोअर करण्यासाठी PUBG Corp सातत्याने ग्लोबल क्लाउड सर्व्हिसेसच्या संपर्कात आहे. अशा प्रकारे कंपनी भारत सरकारने घालून दिलेल्या अटींचे पालन करण्यास समर्थ ठरेल. ही प्रक्रीया सुरळीत झाल्यास पबजी कमबॅक करण्यासाठी सज्ज असेल.

यापूर्वी चीन-आधारित टेंन्सेंट गेम्सकडून हा डेटा हाताळला जात होता. दरम्यान, भारतीय युजर्सच्या डेटाची सुरक्षितता आणि प्रायव्हसी धोक्यात असल्याने पबजी भारतात बॅन करण्यात आले होते. पबजी गेम हा देशाच्या सुरक्षा आणि संरक्षणासंबंधित आहे. त्यामुळे जर डेटा देशातच राहिला तर काही समस्या उद्भवणार नाही. दरम्यान, या वर्षाअखेरच्या आत भारतात पबजी गेम पुन्हा सुरु होईल, अशी माहिती पबजी कॉर्पोरेशनने देशातील काही हाय-प्रोफाइल स्ट्रीमर्सना खासगीपणे दिली आहे.

खात्रीशीर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पबजी भारतात कमबॅक करत असल्याची घोषणा या आठवड्यात कंपनीकडून करण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुढील आठवड्यातील दिवाळीच्या काळात कंपनीची मार्केटींग मोहीम राबवण्याचीही योजना असल्याचेही माहिती समोर येत आहे. हे सर्व सत्यात उतरल्यास भारतातील पबजी चाहत्यांसाठी दिवाळीची मोठी भेट असेल, यात शंका नाही. (PUBG Ban Effect: पबजी बॅन झाल्याने निरागस मुलाने असा व्यक्त केला राग; पहा Funny Video)

दरम्यान, यापूर्वी पबजी गेम्सच्या व्यसनातून अनेक आत्महत्या, हत्या यांसारखे मोठे गुन्हे घडले आहेत. त्यामुळे पबजी बॅन झाल्याने पालकवर्ग खुश होता. मात्र लहान-मोठ्या पबजी प्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती.