जुलैमध्ये रिलायन्स कंपनीच्या पार पडलेल्या वार्षिक बैठकीमध्ये जिओ (jio) गीगाफायबर ब्रॉडबँडची घोषणा करण्यात आली होती. गेले कित्येक दिवस लोक जिओच्या या सेवेची आतुरतेने वाट पाहत आहेत मात्र अजूनही जिओ गीगाफायबर FTTH नेटवर्कला लोकांसाठी रोल आउट केले गेले नाही. काही दिवसांपूर्वीपासून जिओच्या या सेवेसाठी रजिस्ट्रेशनदेखील सुरु झाले होते. त्याचवेळी कंपनीने हे ठरवले होते की, ज्या शहरात या सेवेसाठी जास्त रजिस्ट्रेशन होईल तिथेच ही सेवा आधी सुरु होईल. कंपनी भारतात तब्बल 1,100 शहरांमध्ये ही सेवा पुरवणार आहे. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या फेजमध्ये ही सेवा पुरवण्यासाठी जिओने 30 शहरांची निवड केली आहे.
जिओने निवडलेल्या शहरांमध्ये बंगळूरू, चेन्नई, रांची, पुणे, इंदौर, ठाणे, भोपाळ, लखनऊ, कानपूर, पटना, प्रयागराज, रायपूर, नागपूर, गाझियाबाद, लुधियाना, मदुराई, नाशिक, फरीदाबाद, कोयंबतूर, गुवाहाटी, आगरा, मेरठ, राजकोट, श्रीनगर, अमृतसर, चंदीगड, जोधपूर, कोटा, नवी दिल्ली आणि सोलापूर या शहरांचा समावेश आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ग्राहकांना जिओच्या या ब्रॉडबँड सेवेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना 4500 रु डिपॉझीट म्हणून भरावे लागणार आहे. तर ज्यांच्याकडे आधीच एखादे ब्रॉडबँड आहे ते फक्त 500 रु भरून या सेवेचा उपभोग घेऊ शकतात. प्रीव्ह्यू प्लॅनमध्ये कंपनी सुरुवातीचे 3 महिने महिना/100 जीबी डेटा मुफ्त देणार आहे, ज्याचे स्पीड 100 एमबीपीएस इतके असेल. त्यानंतर 500, 750. 999, 1299 आणि 1500 रुपयांचे 5 प्लॅन ग्राहकांसाठी उपलब्ध असतील. तुम्ही जिओच्या वेबसाईटला जाऊन तुमचे नाव या सेवेसाठी रजिस्टर करू शकता. वर नमूद केलेल्या एखाद्या शहरात तुम्ही राहत असाल तर सर्वात आधी तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकाल.