Jack Dorsey Resigned from Twitter: जॅक डोर्सी यांनी दिला ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा; Parag Agrawal होणार नवे CEO
Twitter CEO Jack Dorsey. (Photo Credit: Getty Images)

ट्विटरचे (Twitter) सीईओ जॅक डोर्सी (Jack Dorsey) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. डॉर्सी ट्विटर आणि स्क्वेअर या दोन्हीचे सीईओ म्हणून काम पाहत होते. 2020 मध्ये कंपनीच्या व्यवस्थापनाशी करार करण्यापूर्वी ट्विटर स्टेकहोल्डर इलियट मॅनेजमेंटने सीईओ म्हणून जॅक डोर्सीची बदली करण्याची मागणी केली होती. आता डॉर्सी यांनी आपले पद सोडले आहे. डोर्सी यांनी एका ट्वीटद्वारे ही माहिती शेअर केली आहे. डोर्सी यांच्यानंतर पराग अग्रवाल (Parag Agrawal) हे ट्विटरचे नवे सीईओ म्हणून धुरा सांभाळतील.

डोर्सीने 2006 मध्ये ट्विटर सुरू करण्यास मदत केली होती. 2008 मध्ये डोर्सी यांची ट्विटरच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर 2015 मध्ये डोर्सी सीईओ पदावर परत येईपर्यंत इतर अनेक अधिका-यांकडून कंपनीचे काम चालले. ट्वीटरसोबतच, डोर्सी यांनी 2010 मध्ये स्क्वेअर नावाचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड पेमेंट प्लॅटफॉर्म देखील विकसित केले. गेल्या वर्षी त्याला बँक उघडण्याची परवानगी मिळाली. इलियट मॅनेजमेंटचे संस्थापक आणि अब्जाधीश गुंतवणूकदार पॉल सिंगर यांनी म्हटले होते की, जॅक डोर्सी यांनी दोन सार्वजनिक कंपन्यांपैकी एकाचे सीईओ पद सोडले पाहिजे. त्यामुळेच आता डोर्सी यांनी ट्विटरचे सीईओ पद सोडले आहे. (हेही वाचा: Jio Tariff Rates: एअरटेल आणि व्होडाफोननंतर जिओनेही वाढवल्या प्लॅन्सच्या किंमती; 1 डिसेंबर 2021 पासून नवे दर लागू)

आपल्या ट्वीटमध्ये डोर्सी म्हणतात, 'कंपनीत सह-संस्थापक ते सीइओ त्यानंतर अध्यक्ष ते कार्यकारी अध्यक्ष त्यानंतर  अंतरिम-सीईओ ते पुन्हा सीईओ असा 16 वर्षांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर, मी ठरवले की आता मला कंपनी सोडण्याची वेळ आली आहे. माझ्यानंतर पराग अग्रवाल कंपनीचा नवा सीईओ असेल.'

डोर्सी पायउतार झाल्याने, पराग अग्रवाल यांना सीईओ म्हणून ट्विटरची अंतर्गत उद्दिष्टे पूर्ण करावी लागतील. कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला सांगितले होते की 2023 च्या अखेरीस 315 दशलक्ष दैनिक सक्रिय वापरकर्ते आणि किमान वार्षिक उत्पन्न दुप्पट करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. सह-संस्थापक जॅक डोर्सी कंपनीच्या मुख्य कार्यकारी पदावरून पायउतार होणार असल्याचे अहवाल समोर आल्यानंतर ट्विटरचे शेअर्स वाढत आहेत. मार्केटमध्ये ट्विटरच्या स्टॉक कामगिरी सातत्याने खराब होत होती, परंतु सोमवारी त्याने ओपनिंग बेलवर 10 टक्क्यांहून अधिक उडी मारली.