EMI on UPI Payments: आता ईएमआय द्वारे करू शकता युपीआय पेमेंट; 'या' बँकेने सुरु केली सेवा, जाणून घ्या सविस्तर
United Payments Interface (Photo Credits: Twitter)

देशातील युपीआय (UPI) द्वारे पेमेंट करणाऱ्या कोट्यावधी ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही युपीआयद्बरे ईएमआयवर (EMI) देखील गोष्ट अथवा वस्तू खरेदी करू शकता. यापूर्वी हप्त्यांवर खरेदी करण्यासाठी क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड आवश्यक होते, परंतु आता तुम्ही युपीआय पेमेंट करताना ईएमआय पर्याय निवडू शकता. ही सुविधा खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने सुरू केली आहे. युपीआय द्वारे पेमेंट करण्याचा ट्रेंड देशात झपाट्याने वाढला असल्याने आयसीआयसीआय बँकेने दिलेली ही सुविधा अनेक ग्राहकांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे.

आता ग्राहक युपीआय पेमेंट करताना कोणताही क्यूआर कोड स्कॅन करून ईएमआयवर वस्तू खरेदी करू शकतील. आयसीआयसीआय बँकेने मंगळवारी युपीआय पेमेंटवर ईएमआय सुविधा सुरू करण्याची घोषणा केली आहे. आता या बँकेचे ग्राहक बाय नाऊ पे लेटर सुविधेचा वापर करून याचा लाभ घेऊ शकतील. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स, किराणा सामान, प्रवास आणि कपड्यांच्या खरेदीवर युपीआय पेमेंट केल्यानंतर तुम्ही खरेदीसाठी खर्च केलेली रक्कम हप्त्यांमध्ये भरू शकाल.

यासंदर्भात आरबीआयच्या घोषणेनंतर आयसीआयसीआय बँकेने ही सुविधा सर्वप्रथम दिली आहे. ग्राहक 10,000 रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम 3, 6 किंवा 9 महिन्यांच्या सुलभ हप्त्यांमध्ये भरू शकतील. आयसीआयसीआय बँकेचे डिजिटल चॅनेल आणि भागीदारी प्रमुख बिजित भास्कर म्हणाले, ‘आम्ही असे निरीक्षण केले आहे की, आजकाल जास्तीत जास्त पेमेंट युपीआय द्वारे केले जाते. अनेक ग्राहक Buy Now Pay Later पर्याय निवडत आहेत, मनी कंट्रोलने अहवाल दिल्याप्रमाणे. हे दोन्ही ट्रेंड लक्षात घेऊन बँक पे लेटरद्वारे केलेल्या युपीआय पेमेंटसाठी इन्स्टंट ईएमआयची सुविधा सुरू करत आहे.’ (हेही वाचा: UPI Transaction Limit: तुम्ही दररोज GPay, PhonePe, Paytm वापरून किती रुपये खर्च करू शकता? जाणून घ्या)

पे लेटरवर ईएमआय सुविधेचा वापर करण्यासाठी, सर्व प्रथम, तुम्हाला दुकानातून वस्तू खरेदी केल्यानंतर पेमेंट करण्यासाठी आयसीआयसीआय बँकेचे iMobile Pay अॅप वापरून ‘कोणताही क्यूआर स्कॅन करा’ पर्याय निवडा.

व्यवहाराची रक्कम 10,000 रुपये किंवा त्याहून अधिक असल्यास PayLater EMI पर्याय निवडा

त्यानंतर 3, 6 किंवा 9 महिन्यांमधील कार्यकाळ निवडा

पेमेंटची पुष्टी करा.

बँकेच्या म्हणण्यानुसार, ही नवीन सुविधा लवकरच ऑनलाइन शॉपिंगसाठीही सुरू केली जाईल. दरम्यान, आयसीआयसीआय बँकेने 2018 मध्ये पे लेटर सुविधा सुरू केली. या सुविधेमुळे ग्राहकांना लहान वस्तू तात्काळ, पूर्णपणे डिजिटल आणि पेपरलेस पद्धतीने खरेदी करता येतात.