Amazon Pay (Photo Credits: IANS)

Amazon Pay ने बुधवारी भारतात 'Amazon Pay Later' सेवा सुरू केली. या सेवेद्वारे कंपनी, Amazon वरून खरेदी करणार्‍या पात्र ग्राहकांना 'व्हर्चुअल लाइन ऑफ क्रेडिट' पुरवेल. या सुविधेचा वापर करून ग्राहकांना रोजच्या वापरातील वस्तूपासून ते इलेक्ट्रॉनिक्स आणि कपड्यांपर्यंतच्या वस्तू खरेदी करता येतील. याशिवाय Amazon.in वर युटिलिटी बिले भरण्यासाठीही ग्राहक या सुविधेचा उपयोग करू शकतात. याचा अर्थ असा की या योजनेसाठी पात्र ग्राहक आता, Amazon इंडियावर सूचीबद्ध असलेली उत्पादने मागवू शकतात आणि पुढील महिन्यात कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता त्याचे पैसे भरू शकतात.

फ्लिपकार्टला टक्कर देण्यासाठी Amazon ने ही सेवा सुरु केली असल्याचे बोलले जात आहे. महत्वाचे म्हणजे जर का तुम्ही मोठ्या रकमेची वस्तू विकत घेतल्यास, त्याचे पेमेंट तुम्ही ईएमआय मध्ये रुपांतरीत करू शकणार आहात. भारतीय ग्राहकांना अधिक खरेदी करण्यास प्रोत्साहित करणे आणि खरेदी दरम्यान त्यांचे बजेट वाढविणे, हे Amazon च्या पे लेटर सेवेचे उद्दीष्ट आहे. Amazon वर खरेदी केल्यानंतर त्याचे पेमेंट तुम्ही पुढच्या महिन्यात करू शकणार आहात, त्यामुळे अधिक ग्राहक Amazon कडे आकर्षित होतील अशी कंपनीची अपेक्षा आहे. (हेही वाचा: JioMart ने व्हॉट्सअ‍ॅपवर सुरु केली Online Shopping ची चाचणी; नवी मुंबई, ठाणे व कल्याण येथे सुविधा उपलब्ध, जाणून घ्या कशी द्यावी ऑर्डर)

याआधी ही सेवा पायलट प्रकल्पांतर्गत काही ग्राहकांसाठी सुरू केली होती. मात्र कंपनीने आता ही योजना हजारो पात्र ग्राहकांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवीन फीचर लॉन्च करण्यासाठी अ‍ॅमेझॉन पेने Capital Float बरोबर भागीदारी केली आहे. कॅपिटल फ्लोटने Karur Vysya Bank ला या सुविधेमध्ये समाविष्ट केले आहे.