मे महिन्यात Airtel आणि Vodafone Idea ने गमावले तब्बल 94 लाख ग्राहक, तर Jio ने जोडले 36 लाख नवे सबस्क्रायबर- TRAI
Vodafone-Idea And Airtel | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

भारती एअरटेल (Bharti Airtel) आणि व्होडाफोन आयडियाचा (Vodafone Idea) ग्राहक वर्ग सातत्याने कमी होत चालला आहे. मे महिन्यातही अशीच परिस्थिती कायम राहिली असून, यामुळे एकूण वायरलेस ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. दुसरीकडे रिलायन्स जिओच्या (Reliance Jio) ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत आहे, ताज्या अहवालानुसार जिओने 36.577 लाखाहून अधिक नवीन ग्राहकांची भर घातली आहे. आश्चर्य म्हणजे जिओ व्यतिरिक्त वायरलेस ग्राहकांची संख्या बीएसएनएल कडेही वाढली आहे. 2 लाख ग्राहक बीएसएनएलशी जोडले गेले आहेत. TRAI च्या लेटेस्ट टेलीकॉम सब्सक्रिप्शन डेटामध्ये हे खुलासे करण्यात आले आहेत. या आकडेवारीनुसार, एप्रिल अखेर वायरलेस ग्राहकांची संख्या 114.952 कोटींनी घटली आहे, मेमध्ये ही संख्या 114.391 कोटी होती.

ट्रायच्या अहवालानुसार, भारती एअरटेलने मेमध्ये 47.428 लाख ग्राहक गमावले आहेत, तर व्होडाफोन आयडियाने 47.263 लाख ग्राहक गमावले आहेत. या अर्थाने, व्होडाफोन आयडिया आणि एअरटेलने अवघ्या एका महिन्यातच 94 लाखाहून अधिक ग्राहक गमावले आहेत. एप्रिलमध्ये झालेल्या नुकसानांपेक्षा या महिन्यात दोन्ही टेलिकॉम कंपन्यांचे अधिक नुकसान झाले असून, एप्रिलमध्ये 7.5 दशलक्ष वायरलेस ग्राहक कमी झाले आहेत. पण यावेळी हा आकडा 94 लाखांचा आहे. (हेही वाचा: LG कंपनीचा अनोखा इलेक्ट्रिक मास्क, कोरोनाच्या व्हायरसच्या सारख्या परिस्थितीत करेल मदत)

रिलायन्स जिओने दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केल्यापासून या दोन्ही कंपन्यांचा बाजारातील वाटा सतत कमी होत आहे. ज्या महिन्यात एअरटेल आणि व्होडाफोनने ग्राहक गमावले, त्याच महिन्यात रिलायन्स जिओने 36.577 लाख ग्राहक कमावले आहेत. जिओबरोबरच बीएसएनएलने मे महिन्यात 2.015 लाख ग्राहकांची भर घालून सर्वांना चकित केले आहे. रिलायन्स जिओचा मार्केट शेअर सर्वाधिक जास्त 34.33 टक्के आहे, तर भारती एअरटेल 27.78 टक्के मार्केट शेअरसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. व्होडाफोन आयडियाचा मार्केट शेअर 27.09 टक्के आहे. या यादीत बीएसएनएल चौथ्या क्रमांकावर आहे, ज्याचा बाजार हिस्सा 10.50 टक्के आहे.