55K Jobs Cut Due To AI: बीटी ग्रुपमध्ये होणार सर्वात मोठी कर्मचारी कपात; आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे जाणार 55 हजार नोकऱ्या
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Twitter)

आतापर्यंत आयटी आणि टेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात (Layoff) केली आहे व त्यात अजून भर पडत आहे. परंतु आता दूरसंचार कंपन्यांनीही लोकांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. युनायटेड किंगडमची दूरसंचार कंपनी बीटी ग्रुप (BT Group), जी पूर्वी ब्रिटिश टेलिकॉम म्हणून ओळखली जात होती, आता 55,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. कंपनीची पुनर्रचना करण्यासाठी आणि खर्चात कपात करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बीटी ग्रुपने गुरुवारी दिली.

बीटी ग्रुप पुढील दशकात 55,000 लोकांना काढून टाकेल. कंपनीत एकूण 1,30,000 कर्मचारी आहेत. यामध्ये पगारावर असलेल्या कर्मचाऱ्यांसह कंत्राटदारांचाही समावेश आहे. बीटी ग्रुपने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे की, 2030 पर्यंत कंपनी आपली कर्मचारी संख्या कमी करून 75,000 ते 90,000 पर्यंत ठेवण्याची तयारी करत आहे. कंपनीचे सीईओ, फिलिप जॅन्सन म्हणाले की, दशकाच्या अखेरीस कंपनी कमी कर्मचारी ठेवेल जेणेकरून खर्च कमी करता येईल. नवीन बीटी गट लहान असून त्याचे भवितव्यही उज्ज्वल असल्याचे त्यांनी सांगितले.

बीटी ग्रुपचे म्हणणे आहे की, त्यांच्या फायबर-ऑप्टिक ब्रॉडबँड आणि 5जी सेवेच्या पूर्ण रोलआउटनंतर, त्यांना एवढ्या मोठ्या कामगारांची गरज भासणार नाही. बीटी ग्रुपने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि स्वयंचलित सेवांमध्ये स्थलांतरित होण्याच्या योजनांदरम्यान 55,000 नोकर्‍या कमी करणार असल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा: IBM Sick Leave: आयबीएम कंपनीचा कर्मचारी 15 वर्षे रजेवर; आता पगार वाढवला नाही म्हणून दाखल केला खटला, जाणून घ्या काय घडले पुढे)

याआधी, यूके स्थित टेलिकॉम कंपनी व्होडाफोनने देखील कंपनी 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार असल्याची घोषणा केली आहे. व्होडाफोन युरोप आणि आफ्रिकेत कार्यरत आहे. जागतिक आर्थिक संकट, चलनवाढीचा वेग आणि आर्थिक वाढ मंदावल्यानंतर कंपन्या सतत त्यांच्या खर्चात कपात करत आहेत. गेल्या काही महिन्यांत टेक आणि टेलिकॉम कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. गुगल, मायक्रोसॉफ्ट, आयबीएम ते फेसबुक, ट्विटर, अॅमेझॉनसारख्या कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.