Commonwealth Games 2022: आज भारतीय पुरुष हॉकी संघ मोहिमेला करणार सुरुवात, घानाविरुद्ध खेळणार पहिला सामना
(Photo Credit: @TheHockeyIndia/Twitter)

बर्मिंगहॅम (Birmingham) येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022) आज भारतीय पुरुष हॉकी संघ (Indian men's hockey team) आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. भारतीय संघाचा पहिला सामना घानासोबत (Ghana) आहे. हा सामना रात्री 8.30 वाजता सुरू होईल. हे दोन्ही संघ 47 वर्षांनंतर आमनेसामने येणार आहेत. यापूर्वी 1975 मध्ये झालेल्या हॉकी विश्वचषकात भारतीय संघ घानाशी भिडला होता. या सामन्यात भारतीय संघाने 7-0 असा विजय मिळवला आज होणाऱ्या सामन्यातही भारतीय संघाचे पारडे जड आहे. भारतीय संघात एकापेक्षा जास्त दिग्गज खेळाडू आहेत, ज्यांना मोठ्या स्पर्धा खेळण्याचा चांगला अनुभव आहे. त्यांच्या तुलनेत घानाच्या खेळाडूंकडे अनुभवाची कमतरता आहे.

असे असूनही, भारतीय संघाला या 36व्या क्रमांकाच्या संघाला हलके घ्यायला आवडणार नाही. कारण यानंतर भारतीय संघाला त्यांच्या पूलमध्ये इंग्लंड, वेल्स आणि कॅनडासारख्या बलाढ्य संघांचा सामना करावा लागणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या प्रो हॉकी लीगमध्ये भारताने तिसरे स्थान पटकावले. गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारतीय संघाने कांस्यपदक जिंकले होते. अशा स्थितीत भारतीय संघाचे मनोबल खूप उंचावेल. हेही वाचा India vs Pakistan, CWG 2022: भारत विरुद्ध पाकिस्तान आज आमनेसामने, जाणून घ्या कधी आणि कुठे येणार पाहता ?

यावेळी राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय संघाकडून सुवर्णाची अपेक्षा केली जात आहे. भारतीय हॉकी संघाला गोल्ड कोस्ट येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2018 मध्ये पदक मिळवता आले नव्हते. हा संघ त्या वर्षी चौथ्या क्रमांकावर राहिला. मात्र 2014 आणि 2010 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. यापूर्वी 2006 मध्ये भारतीय संघ सहाव्या स्थानावर होता आणि 2002 च्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्र ठरू शकला नव्हता.

एकूणच, भारतीय संघाला दीर्घकाळ राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावता आलेले नाही. भारतीय स्टार हॉकीपटू मनप्रीतसाठी हा सामना खूप खास असेल. वास्तविक, भारतासाठी हा त्याचा 300 वा सामना असेल. या क्षणी संपूर्ण लक्ष संघाच्या प्रगतीवर आहे असे जरी तो म्हणत असला तरी वैयक्तिक कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्यास वेळ नाही.