दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: PTI)

टीम इंडियाचा (Team India) दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) आयपीएल (IPL) 2022 च्या मेगा लिलावापूर्वी सूचित केले आहे की दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitls) त्याला आणि माजी कर्णधार श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) रिटेन केले जाणार नाही. आयपीएलच्या रिटेन्शन (IPL Retention) पॉलिसीनुसार एक संघ जास्तीत जास्त 4 खेळाडूंना कायम ठेवू शकतो. यामध्ये जास्तीत जास्त तीन भारतीय किंवा जास्तीत जास्त दोन परदेशी खेळाडूंचा समावेश असू शकतो. दरम्यान अहमदाबाद आणि लखनौ या दोन नवीन फ्रँचायझी लिलावापूर्वी कायम न ठेवलेल्या तीन खेळाडूंची निवड करू शकतात. आयपीएलच्या मेगा लिलाव टिकवून ठेवण्याच्या संभाव्यतेचे विश्लेषण करताना अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर कबूल केले की कॅपिटल्सद्वारे त्याला आणि त्याचप्रमाणे अय्यर, ज्याने 2020 च्या आवृत्तीत संघाचे नेतृत्व केले, त्यांना रिटेन केले जाणार नाही. “मला वाटतं श्रेयस तिथं नाहीये. मी नाहीये. त्यामुळे अजून कुणीतरी यायला हवं होतं. मला नेलं असतं तर कळलं असतं,” तो म्हणाला. (IPL 2022 Auction: डेविड वॉर्नरने दिले संकेत, आयपीएल 15 साठी सनरायझर्स हैदराबाद केन विल्यमसनला करणार रिटेन)

किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्ज) कडून डावखुरा जगदीशा सुचिथच्या जागी खेळल्यानंतर अश्विन 2019 हंगामापूर्वी दिल्लीत सामील झाला होता. फ्रेंचायझीसाठी खेळलेल्या 28 डावांमध्ये अश्विनने 7.55 च्या इकॉनॉमी रेटने 20 विकेट्स घेतल्या आहेत. दुसरीकडे, अय्यरने 2015 मध्ये कॅपिटल्सने (तेव्हा दिल्ली डेअरडेव्हिल्स) मध्ये 2.6 कोटी रुपयांत खेळाडूंच्या लिलावातून संघात सामील केले होते. आयपीएल 2018 लिलावात फ्रँचायझीने त्याला कायम ठेवले आणि काही दिवसांनी त्याची कर्णधार म्हणून नियुक्तीची घोषणा करण्यात आली होती. 2019 मध्ये त्याच्या नेतृत्वात दिल्लीने पहिल्यांदा स्पर्धेचा फायनल टप्पा गाठला होता. 2020 मध्ये अंतिम लढाईत फ्रँचायझीला मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करावा लागला होता. श्रेयसने फ्रँचायझीसाठी 86 डावांमध्ये फलंदाजी केली आणि 16 अर्धशतकांसह 31.7 च्या रेटने 1916 धावा केल्या.

दरम्यान, दिल्ली रिटेन करू शकणाऱ्या खेळाडूंच्या शक्यतेबाबत बोलायचे तर 2021 च्या मोसमात संघाला प्लेऑफमध्ये नेणारा कर्णधार रिषभ पंत, सलामीवीर पृथ्वी शॉ आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिच नॉर्टजेला परदेशी पर्याय म्हणून दिल्लीला कायम ठेवण्याची शक्यता आहे. याशिवाय चौथा भारतीय एकतर मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा आवेश खान किंवा अक्षर पटेलसारखा अष्टपैलू खेळाडू असण्याची शक्यता आहे.