Tokyo Olympics: टोकियो ऑलिम्पिकच्या नव्या तारखांची घोषणा; आता 23 जुलै ते 8 ऑगस्ट 2021 दरम्यान पार पडणार स्पर्धा
Tokyo Olympics (Photo Credits: Wikimedia Commons)

कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आलेल्या टोकियो ऑलिम्पिकच्या (Tokyo Olympics) नवीन तारखांची सोमवारी घोषणा करण्यात आली. टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, आता 23 जुलै 2021 रोजी या सोहळ्याचे उद्घाटन होईल व 8 ऑगस्ट 2021 रोजी उद्घाटन सोहळ्याचा समारोप पार पडेल. पॅरालंपिक खेळ 24 ऑगस्ट 2021 ते 5 सप्टेंबर 2021 या काळात होणार आहेत, परंतु हे खेळ टोकियो 2020 म्हणून ओळखले जातील. यापूर्वी हे खेळ 24 जुलै 2020 रोजी सुरू होणार होते, मात्र सध्याच्या परिस्थितीच्या दबावामुळे ते पुढे ढकलले गेले.

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे (Japan PM Shinzo Abe) यांनी कोरोना व्हायरसच्या वाढत्या धोक्याच्या दृष्टीने, ऑलिम्पिक तहकूब करण्याबाबत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीशी (IOC) बोलणी केली होती. त्यानंतर आयओसीने ऑलिम्पिक पुढे ढकलण्यास सहमती दर्शविली. गेल्या आठवड्यात, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि जपान सरकारने कोरोना विषाणूच्या साथीमुळे, हे खेळ 2021 पर्यंत तहकूब करण्याचा निर्णय घेतला. जपानमध्ये वसंतामध्ये जेव्हा चेरीचा मोहोर उमलतो तेव्हा या खेळांचे आयोजन केले जावे, अशी चर्चा रंगत होती. परंतु त्यावेळी युरोपियन फुटबॉल आणि उत्तर अमेरिकन स्पोर्ट्स लीग असतात त्यामुळे या काळात ऑलिम्पिक घेण्यास नकार देण्यात आला. (हेही वाचा: Asia Cup 2020: बीसीसीआय अधिकाऱ्याचा मोठा खुलासा, एशिया कपच्या आयोजनावर केले 'हे' मोठे विधान)

टोकियोच्या आयोजन समितीचे प्रमुख योशिरो मोरी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तोशिरो मुतो यांनी सांगितले होते की, नवीन तारखेला खेळांचे आयोजन केल्यास खर्च खूप वाढू शकतो. स्थानिक अहवालानुसार या खर्चात कोट्यवधी डॉलर्सची वाढ होणार असून, त्याचा भार जपानच्या करदात्यांवर पडणार आहे. जपान अधिकृतपणे ऑलिम्पिकचे आयोजन करण्यासाठी 12.6 अब्ज डॉलर्स खर्च करत आहे. जपान सरकारच्या एका ऑडिट ब्युरोने मात्र याचा खर्च दुप्पट असल्याचे सांगितले.

कोरोनाच्या उद्रेकानंतर फक्त जगच मंदावले नाही, तर अनेक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धाही एकामागून एक रद्द करण्यात आल्या. 'खेळांचा महाकुंभ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑलिम्पिकलाही याचा फटका बसला. एखाद्या साथीच्या आजारामुळे ऑलिम्पिक पुढे ढकलण्याची ही पहिलीच वेळा आहे.