पॉल पोग्बा (Photo Credits: Getty Images)

फ्रान्स आणि मँचेस्टर युनायटेडचा मिडफील्डर पॉल पोग्बा (Paul Pogba) कोविड-19 (COVID-19) पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. यामुळे तो स्वीडन आणि क्रोएशियाविरुद्ध राष्ट्रीय संघाच्या राष्ट्रीय लीग सामन्यात भाग घेणार नाही. फ्रेंच प्रशिक्षक दिदिएर डेसचैंप्स (Didier Deschamps) यांनी याची पुष्टी केली. डेसचैंप्स म्हणाले की पोगबा संघात सामील होणार आहे पण कोविड-19 संसर्ग झाल्यामुळे यापुढे संघात सामील होऊ शकणार नाही. त्याच्याऐवजी इडुआर्डो कारनाविंगा (Eduardo Camavinga) या युवा फुटबॉलरला संधी दिली जाईल. कारनाविंगा लिग 1 साइड रेनेसकडून खेळला. दरम्यान, मॅनचेस्टर युनायटेडच्या स्टारने नुकतंच झालेल्या प्रीमियर लीगमध्ये (Premier League) युनाइटेड कडून कोविड-प्रेरित ब्रेकनंतर दुखापतीतून पुनरागमन केले. लीगमधील पहिल्या तीनमध्ये युनायटेडला (United) स्थान मिळवून देण्यास त्याने महत्वाची भूमिका बजावली आणि ब्रुनो फर्नांडिससमवेत एक मजबूत भागीदारी रचली. पोगबाची फ्रान्सच्या संघात निवड निश्चित होती पण कोरोना पॉसिटीव्ह आढळल्यानंतर त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. तो आता क्वारंटाइन राहील.

पोग्बा अखेर सेव्हिलाविरुद्ध युरोपा लीग सेमीफायनल फेरीत मॅनचेस्टर युनायटेडकडून खेळताना दिसला होता. पोग्बाने फ्रान्सकडून 69 सामने खेळले आहेत आणि 10 गोल केले आहेत. 2018 मध्ये तो विश्वचषक जिंकणार्‍या फ्रान्स संघाचा सदस्य होता. पोग्बाला राष्ट्रीय संघातून वगळण्यात आले आहे, तर मॅन्चेस्टर युनायटेडचा फॉरवर्ड अँथनी मार्शल फ्रेंच संघात परतला आहे. गेल्या हंगामात स्ट्रायकरच्या भूमिकेत मार्शल युनायटेडसाठी उदात्त फॉर्ममध्ये होता आणि त्याच्या कामगिरीबद्दल त्याला बक्षीस मिळालं आहे. फ्रान्सच्या हल्ल्यात तो काइलन मबप्पे आणि अँटोईन ग्रीझमन यांच्याबरोबर सामील होणार आहे.

युनायटेडने एका निवेदनात म्हटले की, “कोविड-19 पॉझिटिव्ह असल्याने पोगबाच्या जागी दुसर्‍या खेळाडूचा संघात समावेश केला जाईल. क्लबमधील प्रत्येकजण पोग्बाच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी शुभेच्छा देत आहेत.’’ युएफा नेशन्स लीगमध्ये फ्रान्सचा अनुक्रमे 5 आणि 8 सप्टेंबर रोजी स्वीडन आणि क्रोएशियाविरुद्ध सामना होणार आहे.