National Sports Awards 2020: यंदा वर्चुअल समारंभात होणार राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण, सात्विकसाईराज रंकीरेड्डीसह 3 कोरोना पॉसिटीव्ह विजेते ऑनलाईन सोहळ्याला मुकणार
राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Photo Credits: PTI/File)

29 ऑगस्ट रोजी आयोजित होणारे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार (National Sports Awards) 2020 हे इतिहासात पहिल्यांदा वर्चुअल समारंभात प्रदान केले जाईल. शनिवारी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) हा पुरस्कार अक्षरशः ऑनलाईन/ वर्चुअल पद्धतीने प्रदान करणार आहेत. व्हर्च्युअल स्वरुपात राष्ट्रपती कोविंद (President Kovind) राष्ट्रपती भवनातून एनआयसी लिंकद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात उपस्थित राहतील, तर देशभरातील विविध ठिकाणी SAI आणि NIC केंद्रांवर विजेते उपस्थित राहतील. केंद्रीय युवा कार्यमंत्री आणि इतर मान्यवर पुरस्कार सोहळ्यासाठी विज्ञान भवनात उपस्थित असतील. सात श्रेणींमध्ये 74 पुरस्कार आहेत आणि एकूण 65 पुरस्कार विजेते विविध ठिकाणाहून या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. 9 पुरस्कार विजेते या समारंभास उपस्थित राहणार नाहीत. त्यापैकी काही आयसोलेशनमध्ये आहेत आणि काही कोरोना (Coronavirus) पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे तर काही देशाबाहेर आहेत. खेलरत्न पुरस्काराने सन्मानित होणार क्रिकेटर रोहित शर्मा सध्या आयपीएलसाठी युएईमध्ये आहे. (National Sports Awards 2020: रोहित शर्मा, टेबल-टेनिस चॅम्पियन मनिका बत्रासह 5 खेळाडूंना खेल रत्न पुरस्कार जाहीर; पाहा अर्जुन, द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण लिस्ट)

यावर्षी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जिंकलेला बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रंकीरेड्डीसह (Satwiksairaj Rankireddy) तीन खेळाडू कोरोना पॉसिटीव्ह आढळले आहेत. "कोरोना पॉसिटीव्ह आढळल्यानंतर तीन पुरस्कार विजेते या कार्यक्रमास उपस्थित राहणार नाहीत," अशी नावे न देता SAIने म्हटले. यंदा, पाच खेळाडूंना राजीव गांधी खेलरत्न आणि 27 जणांना अर्जुन पुरस्कार देण्यात येणार आहेत. खेलरत्न मिळालेल्यांमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा, कुस्तीपटू विनेश फोगट, पॅरालंपियन मरियाप्पन थंगवेलू, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा आणि महिला हॉकी कर्णधार राणी रामपाल यांचा समावेश आहे.

SAIने पुढे म्हटले की आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करीत सर्व आरोग्य आणि सुरक्षा प्रोटोकॉलचे अनुसरण जिथे मान्यवर व पुरस्कार देण्यात येणाऱ्या ठिकाणी केले जाईल. “पुढे, क्रीडा मंत्रालयाने प्रत्येक पुरस्कार विजेत्यास कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापूर्वी कोविड-19 चाचणी घेण्याचा सल्ला दिला आहे. सर्व केंद्रांची पूर्णपणे स्वच्छता करण्यात आली आहे आणि पुरस्कार सोहळ्यादरम्यान सामाजिक अंतर निश्चित केले जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे," त्यांनी पुढे म्हटले. हा कार्यक्रम दूरदर्शनवर थेट प्रसारित केला जाईल.