KPL Match Fixing: केपीएल स्पॉट फिक्सिंग घोटाळ्यात कर्नाटकचे माजी रणजी खेळाडू सीएम गौतम, अबरार काझी यांना अटक
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

कर्नाटक प्रीमियर लीग (केपीएल) मधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आणखी दोन क्रिकेटपटूंना अटक करण्यात आली आहे. केंद्रीय गुन्हे शाखेने बेल्लरी टस्कर्स (Ballari Tuskers) संघाचा कर्णधार सीएम गौतम (CM Gautam) आणि विकेटकीपर अबरार काझी (Abrar Kazi) यांना अटक केली आहे. या फिक्सिंग प्रकरणात आतापर्यंत सहा केपीएल खेळाडूंना अटक करण्यात आली आहे. केंद्रीय गुन्हे शाखा मागील दोन मोसमातील फिक्सिंगची चौकशी करत आहे. यापूर्वी 26 ऑक्टोबरला बेंगलुरू ब्लास्टर्सचे गोलंदाजी प्रशिक्षक विनू प्रसाद आणि फलंदाज विश्वनाथ यांना अटक केले होते. बेलागावी पँथर्सविरूद्ध खेळलेला सामना बुकींसह सामना फिक्स करण्याचा आरोप कोचवर आहे. आगामी रणजी मोसमात गौतम गोवा, तर अबरार मिझोरम संघात समावेश करण्यात आला होता. कर्नाटक आणि गोव्याकडून रणजी खेळण्याव्यतिरिक्तगौतम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स या संघाकडून आयपीएल खेळला होता. (KPL Match Fixing: बॅट बदलत, स्लीव्ह्स फोल्ड करून फलंदाज देत होता बुकीला सिग्नल; 10 पेक्षा कमी धावा करण्यासाठी मिळायले होते 5 लाख रुपये)

दरम्यान, स्पोर्टस्टारच्या रिपोर्टनुसार या दोन्ही खेळाडूंना केपीएलच्या अंतिम सामन्यात संथ फलंदाजी करण्यासाठी 20 लाख रुपये देण्यात आले होते. याशिवाय बेंगुलारू ब्लास्टर्सविरूद्ध सामन्यात झालेल्या फिक्सिंगमध्येही या दोघांचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे. या सामन्यात टस्कर्सचा कर्णधार गौतमने 37 चेंडूत 29 धावा केल्या, तर अबरार काझीने 6 चेंडूत 1 धावा केल्या होत्या. गौतम कर्नाटकातील मुख्य खेळाडूंमधील एक आहे. 2013-14 आणि 2014-15 मध्ये कर्नाटकने जिंकलेल्या विजेतेपदामध्ये त्याने महत्वाची भूमिका बजावली होती. तो भारत अ संघासाठीही खेळला आहे. शुक्रवारी सुरू झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी या दोन्ही खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता. मात्र, आता तो या स्पर्धेत खेळू शकणार नाही.

कर्नाटक प्रेमिअर लीगमधील मॅच फिक्सिंगचा मुद्दा पहिल्यांदा सप्टेंबरमध्ये समोर आला होता, जेव्हा बेलागी संघाचा मालक अली अशफाक थारा (Ali Asfak Thara) याला अटक करण्यात आली होती. यानंतर, 26 ऑक्टोबरला बेंगलुरू ब्लास्टर्सचा गोलंदाजी प्रशिक्षक वीणू प्रसाद (Vinu Prasad) आणि फलंदाज विश्वनाथन (M Viswanathan) यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात गुन्हे शाखेने मागील आठवड्यात बंगळुरू संघाचा खेळाडू निशांत सिंह शेखावत याला अटक केली होती.