क्रिकेटर मोहम्मद शमी ची पत्नी हसीन जहां ला अटक; सासरी घरात घुसून घातला गोंधळ
हसीन जहाँला अटक (संग्रहित-संपादित प्रतिमा)

सध्या चालू असलेल्या आयपीएल (IPL)मध्ये मोहम्मद शमी (Mohammed Shami) किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळत आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून शमीच्या वैयक्तिक आयुष्यात चढ उतार चालू आहेत. शमीची पत्नी हसीन जहाँने शमीच्या विरोधात विवाहबाह्य संबंध, घरगुती हिंसा, मारहाण असे अनेक आरोप केले होते. हे प्रकरण मिटत असतानाच हसीनने एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. तिने रविवारी थेट शमीच्या डिडौली येथील घरी जाऊन तमाशा केला. याबाबत तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी हसीनला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मुलगी बेबो आणि तिची आया सोबत हसीन शमीच्या घरी म्हणजे आपल्या सासरी पोहचली. आधीपासून सुरु असलेल्या वादामुळे शमीच्या कुटुंबीयांनी तिला घरात घेण्यास नकार दिला. त्यानंतर तिने जबरदस्तीने घरात घुसून स्वतःला एका खोलीत डांबून घेतले. त्यानंतर सासू आणि दिर यांच्याशी तिचा वाद सुरू झाला, हा वाद इतका वाढला की आजूबाजूचे लोकही जमा झाले. त्यानंतर रात्री 1 वाजता पोलिसांना पाचारण करण्यात आले, व पोलिसांनीच तिला खोलीबाहेर काढले. (हेही वाचा: Sexual Harassment प्रकरणी क्रिकेटपटू मोहम्मद शमी याच्या विरोधात आरोपपत्र दाखल)

त्यानंतर पोलिसांनी हसीनला अटक केली आहे. सध्या तिची मानसिक स्थिती तपासण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पोलिसांच्या नजरकैदेत ठेवले आहे. दरम्यान या प्रकरणानंतरही तिचे शमीबद्दल आरोप करणे सुरूच होते. पैशाचा आणि दबावाचा वापर करून मला त्रास देणे सुरु ठेवले आहे, अजूनही शमी माझ्याशी गैरवर्तन करत आहे. पोलिसांनीही मला त्रास दिला, मला व माझ्या मुलीला उपाशी ठेवले असे आरोप हसीनने केले आहेत. दरम्यान, हसीन जहाँ हिने शमीवर मॅच फिक्सिंगचे आरोपही केले होते, मात्र बीसीसीआयने या प्रकरणात शमीला क्लिन चिट दिली होती.