21 नोव्हेंबरला कोलकाता येथे भारतीय निवड समितीची बैठक झाली. त्यामध्ये वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध टी -20 आणि वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. बांग्लादेशविरुद्ध संघात निवड झालेल्या विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) याला संधी न देता संघातून वगळण्यात आले. मात्र, आता संजूला पुन्हा भारतीय संघात (Indian Team) स्थान मिळाल्याचे वृत्त समोर आले आहे आणि तो विंडीजविरुद्ध टी-20 मालिकेत खेळू शकतो. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या एका मॅचदरम्यान टीम इंडियाचा अनुभवी सलामी फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) याला दुखापत झाली आहे. धवनच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आणि त्याच्या वैद्यकीय स्थितीच्या अहवालावर अंतिम निर्णय अवलंबून आहे. "धवनच्या जागी सॅमसनचा संघात समावेश होऊ शकेल. धवनच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली, वैद्यकीय स्थितीच्या अहवालानुसार अंतिम निणर्य होईल," असे बीसीसीआयच्या सूत्रांनी एएनआयला सांगितले. (IND vs WI 2019: टीम इंडियाविरुद्ध वनडे मालिकेआधी वेस्ट इंडिजला धक्का, क्रिस गेल याने घेतला क्रिकेटमधून ब्रेक, जाणून घ्या कारण)
सूरतमध्ये महाराष्ट्र विरुद्ध सुपर लीगचा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा सामना खेळताना धवनच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली. द हिंदूच्या रिपोर्टनुसार, फलंदाजीदरम्यान धावचीत होण्यापासून बचावासाठी जेव्हा त्याने संपूर्ण स्ट्रेच केलं तेव्हा ही घटना घडली. यावेळी त्याच्या पॅडवरील लाकडाचा तुकडा त्याच्या गुडघ्यात शिरला. तो आऊट होऊन पॅव्हिलिअनमध्ये परतल्यावर त्याला रक्तस्त्राव झाल्याचे त्याच्या लक्षात आले. दरम्यान, अतिरिक्त सदस्य म्हणून सॅमसनला संघात स्थान देण्यात येईल. विंडीजविरुद्ध भारतीय संघाची घोषणा केल्यावर एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्वात निवड समितीवर केरळच्या या स्टार क्रिकेटपटूला वगळण्याच्या निर्णयाबद्दल तीव्र टीका केली होती.
सॅमसनने 2014 झिम्बाब्वे दौऱ्यातून आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्या दौर्यावर त्याने एक टी-20 सामना खेळला होता आणि लवकरच त्याला वगळण्यात आले होते. टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्यासाठी केरळच्या या क्रिकेटपटूला आणखी चार वर्षे प्रतीक्षा करावी लागली.