Year Ender 2021: भारताचे ‘हे’ पाच युवा स्टार खेळाडू ठोठावताहेत टीम इंडियाचे दार, 2022 मध्ये करू शकतात आंतरराष्ट्रीय पदार्पण
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

भारतीय क्रिकेट टीम (Indian Cricket Team) सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात मजबूत संघ आहे यामध्ये शंका नाही. विद्यमान खेळाडूंसह यामागील मुख्य कारण म्हणजे टीम इंडियाची बेंच ताकद. राष्ट्रीय संघातील एकही खेळाडूला दुखापत झाल्यास त्याची बदली म्हणून संघात स्थान घेण्यासाठी खेळाडू तयार आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. कसोटी मालिकेच्या निर्णायक क्षणी अनुभवी खेळाडूंच्या दुखापतीनंतर भारताच्या युवा शिलेदारांनी जबरदस्त खेळ दाखवत मालिका जिंकली. अलीकडेच श्रीलंका दौऱ्यावर अनेक युवा खेळाडूंनी देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहले पाऊल टाकले. आयसीसीच्या वेळापत्रकानुसार आतापासून दरवर्षी मोठ्या स्पर्धा होणार आहे. अशा परिस्थितीत युवा खेळाडूंना अनुभव मिळावा आणि कोणत्याही महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी चांगली कामगिरी करता यावी यासाठी त्यांना तयार असणे अत्यंत आवश्यक आहे. अशा स्थितीत पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय वरिष्ठ संघात पदार्पण करू शकतात अशा खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत. (Cricketers Debut in 2021: बापरे! यावर्षी टीम इंडियाला लागला जॅकपॉट, तब्ब्ल 13 क्रिकेटपटूंनी केले आंतरराष्ट्रीय पदार्पण; पहा कोण Hit कोण Flop)

आवेश खान (Avesh Khan)

न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात झालेल्या टी-20 मालिकेसाठी आवेश खानची निवड करण्यात आली होती पण त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. तथापि पुढील वर्षी भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. आवेश एक युवा खेळाडू असून भविष्यासाठी त्याच्यात गुंतवणूक करणे संघासाठी फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे पुढील वर्षी पदार्पण करू शकणाऱ्या भारतीयांपैकी तो एक आहे.

व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer)

स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याचा खराब फॉर्म व्यंकटेश अय्यरसाठी चांगलाच लाभदायक ठरला आहे. न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेतून त्याने आत्तराष्ट्रीय पदार्पण केले. आणि आता पुढील वर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडिया वनडे मालिका देखील खेळणार आहे. त्यामुळे जर रवींद्र जडेजा दुखापतीमुळे उपलब्ध नसल्यास अय्यरला झटपट क्रिकेटनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये देखील अष्टपैलू म्हणून पदार्पणाची संधी मिळू शकते.

रवी बिश्नोई (Ravi Bishnoi)

भारतातील लेगस्पिनरची स्थिती सध्या उत्साहवर्धक नाही. भारत युजवेंद्र चहलवर जास्त काळ विसंबून राहील याची खात्री नाही. तसेच राहुल चाहर अलीकडच्या काही महिन्यांत सर्वोत्तम कामगिरी करत नाही. त्यामुळे भारताच्या फिरकी गोलंदाजीचे भविष्य मानल्या जाणाऱ्या रवी बिश्नोईचा निवडकर्ते नक्कीच विचार करू शकतात. बिश्नोईने आधीच आयपीएलमध्ये आपले कौशल्य दाखवले आहे आणि त्याचे स्पर्धक खेळाडू सर्वोत्तम लयीत नसल्यामुळे त्याला 2022 मध्ये नक्कीच पहिली संधी दिली जाऊ शकते.

अर्शदीप सिंह (Arshdeep Singh)

टीम इंडियाला सध्या अशा डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाची गरज आहे, ज्यावर ते अवलंबून राहू शकतात. मात्र अलीकडे व्यवस्थापनाला एकही सापडलेला नाही. अर्शदीप सिंहने आयपीएलच्या गेल्या दोन हंगामात चांगली कामगिरी केली आहे आणि त्याला संधी मिळाली आहे. त्याने आयपीएल 2021 मध्ये 18 विकेट घेतल्या आणि डेथ ओव्हरमध्ये त्याच्या कौशल्याने अनेकांना प्रभावित केले. त्यामुळे पंजाबचा हा युवा क्रिकेटपटू पुढील वर्षी पदार्पण करू शकतो.

केएस भरत (KS Bharat)

देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी केलेल्या श्रीकर भरतची यंदा न्यूझीलंड विरोधात कसोटी मालिकेसाठी निवड झाली होती. मात्र रिद्धिमान साहाने संधीला फायदा करून घेतल्याने भरतला पदार्पणाची संधी मिळाली नाही. मात्र साहाला दुखापत झाल्याने त्याने किवींविरुद्ध पहिल्या सामन्यात आपल्या विकेटकिपिंगने क्रिकेट तज्ञ आणि चाहत्यांना चांगले प्रभावित केले. भरतला या वर्षी भारतीय इलेव्हनमध्ये संधी मिळाली नसली तरी 2022 मध्ये त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर बॅटने आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळू शकते.