टीम इंडिया (Photo Credit: PTI)

Cricketers Debut in 2021: 2021 वर्षाचा अंतिम महिना, डिसेंबर, सुरु झाला आहे. डिसेंबर म्हटले की सर्वांनाच उत्सुकता असते ती म्हणजे नवीन वर्षाची. भारतीय क्रिकेट संघासाठी (Indian Cricket Team) यंदाचं वर्ष काही विशेष राहिले नाही. इंग्लंड आणि न्यूझीलंड संघांना मायदेशात विराट कोहलीच्या टीम इंडियाने (Team India)धोबीपछाड दिला, पण आयसीसी टी-20 वर्ल्ड कप  (ICC T20 World Cup) स्पर्धेत खेळाडूंनी मात्र चाहत्यांची चांगलीच निराशा केली. मात्र भारतीय क्रिकेटसाठी दिलासादायक बातमी म्हणजे अनेक युवा खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोक्ता आगमनाचा डंका वाजवला. एक वेळ अशी होती की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाय रोवण्यापूर्वी नवोदितांना स्थिर होण्यासाठी वेळ लागायचा. यावर्षी म्हणजे 2021 मध्ये एक, दोन नाही तर तब्ब्ल 13 खेळाडूंनी भारताकडून खेळाच्या विविध स्वरूपात आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. अशाच खेळाडूंबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण करणारे खेळाडू-

श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)

टीम इंडियाचा युवा फलंदाज श्रेयस अय्यरने न्यूझीलंडविरुद्ध पदार्पणाच्या सामन्याची सुरुवात केली. आपल्या पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यरने पहिल्या डावात 105 धावा आणि दुसऱ्या डावात 65 धावा केल्या.

टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर (ब्रिस्बेन टेस्ट)

टीम इंडियाने वर्षाची सुरुवात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पुन्हा एकदा कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजयासह केली. या मालिकेत अनेकांनी आपले मूल्यवान योगदान दिले त्यापैकी म्हणजे नटराजन (T Natarajan) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar). रवींद्र जडेजा आणि आर अश्विनच्या दुखापतींनी या दोघांसाठी कसोटी संघाचे दार उघडले. आणि दोघांनी संधीचं सोनं करून दाखवलं. सुंदरने शार्दूल ठाकूरसह संघ अडचणीत असताना 123 धावांची भागीदारी करून ऑस्ट्रियन संघावर वर्चस्व गाजवले. सुंदरने पदार्पणातच अर्धशतक केले आणि 62 धावा केल्या. दुसरीकडे, नटराजनने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या तीन विकेट घेऊन यजमान संघाचं कंबरडं मोडलं.

अक्षर पटेल (इंग्लंड कसोटी)

इंग्लंडच्या भारत दौऱ्यावेळी जडेजाच्या दुखापतीने अक्षर पटेलला (Axar Patel) कसोटी पदार्पणाची संधी दिली. चेन्नईमधील रँक टर्नरवर धोकादायक उसळी आणि किंचित वळण निर्माण करून, गुजरातच्या फिरकीपटूने 2/40 आणि 5/60 अशी गोलंदाजी करून भारताला मालिकेत पुनरागमन करून दिले. अखेरीस त्याने आपली पहिली कसोटी मालिका तीन कसोटीत 10.59 च्या जबरदस्त सरासरीने 27 विकेट घेऊन पूर्ण केली.

T20 मध्ये पदार्पण करणारे खेळाडू-

ईशान किशन

टीम इंडियाचा युवा फलंदाज इशान किशनने 2021 साली टीम इंडियासाठी टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. इशान किशनने पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना इंग्लंडविरुद्ध खेळला. या सामन्यात इशान किशनने 56 धावा केल्या.

पृथ्वी शॉ

पृथ्वी शॉ या वर्षी श्रीलंकेविरुद्ध पहिला T20 आंतरराष्ट्रीय खेळला. या सामन्यात पृथ्वी शॉ पहिल्याच चेंडूवर भोपळा न फोडता बाद झाला.

सूर्यकुमार यादव

टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवनेही यावर्षी इंग्लंडविरुद्ध पदार्पण सामना खेळला. या सामन्यात सूर्यकुमार यादवला फलंदाजीची संधी मिळाली नाही.

वनडे पदार्पण करणारे खेळाडू-

ईशान किशन

युवा फलंदाज किशनने यावर्षी टी-20 आणि वनडेमध्ये पदार्पण केले. ईशानने पहिला वनडे श्रीलंकेविरुद्ध खेळला. या सामन्यात किशनने 59 धावा केल्या.

कृणाल पांड्या 

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू क्रुणालने 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला. पहिल्या एकदिवसीय सामन्यात कृणाल पंड्याने नाबाद 58 धावांची खेळी केली आणि बॉलने एक विकेट घेतली.

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादवने कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिला वनडे खेळला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने 31 धावांची तुफानी खेळी केली.

दरम्यान वरील खेळाडूंव्यतिरिक्त चेतन साकारिया, संदीप वॉरियर, नितीश राणा, देवदत्त पडिक्कल आणि वरुण चक्रवर्ती अशा आयपीएल 2021 मध्ये चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडूंनी देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले पाऊल ठेवले आहे. श्रीलंका दौऱ्यावर कृणाल पांड्या कोविड-19 पॉझिटिव्ह आढळल्यावर त्याच्या संपर्कात आलेले अनेक खेळाडू क्वारंटाईन झाले होते ज्यामुळे या दौऱ्यावर अनेक युवा खेळाडूंना टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली.