Year-Ender 2021: आंतरराष्टीय क्रिकेटमध्ये सध्या विराट कोहलीची (Virat Kohli) जोरदार चर्चा रंगली आहे. बीसीसीआयने (BCCI) त्याला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवले आहे. रोहित शर्माकडे टी-20 नंतर वनडे संघाचे कर्णधारपदही सोपवण्यात आले आहे. टी-20 विश्वचषक 2021 नंतर कोहली स्वतः टी-20 संघाचे कर्णधार पदावरून पायउतार झाला. इतकंच नाही तर विराटने आयपीएल (IPL) 2021 नंतर आरसीबीच्या कर्णधारपदाचाही राजीनामा दिला आहे. म्हणजेच एकूणच हे वर्ष त्यांच्यासाठी खराब राहिले असे म्हणता येईल. याशिवाय त्याला या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावता आले नाही. तसेच आयसीसी विश्वचषक (ICCC World Cup) स्पर्धेचे विजेतेपद देखील टीम इंडिया काबीज करू शकली नाही. वर्ष 2021 कोहलीसाठी अजिबात चांगले राहिले नाही आणि त्याला हे वर्ष नक्कीच विस्मरणीय ठरले. (Year-Ender 2021: विराट कोहलीची ODI कर्णधार पदावरून हकालपट्टी ते टिम पेनचा ‘सेक्सटिंग’ विवाद, 2021 मध्ये ‘या’ वादांमुळे क्रिकेट विश्वाला बसला धक्का)
कोहलीने यावर्षी भारतीय टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती, परंतु त्याला वनडे संघाचे कर्णधारपद कायम ठेवायचे होते. आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 नंतर त्याने ती-20 संघाचे कर्णधारपद सोडले, परंतु दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापूर्वी त्याला ODI संघाच्या कर्णधार पदावरून काढून टाकण्यात आले. वनडे संघाच्या कर्णधार पदावरून हकालपट्टी त्याच्यासाठी खूप निराशाजनक ठरली आणि तो हे फार काळ विसरणार नाही. कोहलीला कर्णधार पदावरून हटवण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात त्याच्या नेतृत्वातील अपयश आहे. कोहलीने टी-20 विश्वचषक 2021 स्पर्धेत पहिल्यांदा आणि अंतिम वेळी भारताचे नेतृत्व केले. टीम इंडिया विजेतेपदाचा मोठा दावेदार असल्याचे मानले जात होते, मात्र भारतीय संघाला ग्रुप स्टेजच्या पुढे प्रगती करता आली नाही. यापूर्वी कोहलीच्या नेतृत्वात चांगल्या कामगिरीनंतर भारताने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली, पण अजिंक्यपद सामन्यात टीम इंडियाला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला आणि भारत प्रथमच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावण्यापासून वंचित राहिला. भारतासाठी ही मोठी संधी होती जी कोहलीच्या नेतृत्वात त्यांनी गमावली.
याशिवाय त्याची आयसीसी क्रमवारीत देखील घसरण झाली. एकदिवसीय क्रमवारीत कोहली पहिल्या क्रमांकावरून घसरला, तर कसोटी क्रमवारीत तो सहाव्या स्थानावर पोहोचला. तसेच विराट 2019 नंतर आतापर्यंत तीनही फॉरमॅटमध्ये मिळून एकही शतकी धावसंख्या पार करू शकलेला नाही. त्याने अखेर बांगलादेशविरुद्ध कोलकाता कसोटी सामन्यात शतक झळकावले होते.