भारतासह जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिलेल्या इंडियन प्रीमिअर लीग (IPL)च्या पुढील वर्षी पार पडणाऱ्या हंगामासाठी आज (गुरुवार, 19 डिसेंबर 2019) लिलाव पार पडला. या लिलावादरम्यान, विविध क्रिकेटपटूंवर बोली लागली. काहींना कोट्यवधी रुपयांना विकत घेतले गेले. तर काहींवर बोलीच न लागल्याने ते विकलेच गेले नाहीत. त्यामुळे या लिलावात विविध खेळाडू चर्चेत आले. पण, खऱ्या अर्थाने चर्चेत राहिला तो मुंबईचा यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal). अंडर 19 क्रिकेट संघाचा कर्णधार प्रियम गर्ग, ध्रुव चंद जुरेल, आणि यशस्वी जायस्वाल हे खेळाडू या लिलावात विशेष चर्चेत राहिले. सर्वाधिक चर्चा झाली ती यशस्वी जैस्वाल याच्या बोलीची. यशस्वी जैस्वाल राजस्थान रॉयल्स संघाने तब्बल 2.4 कोटी रुपयांची बोली लावत खरेदी केले. यशस्वीवर लागलेल्या बोलीपेक्षा तो जो संघर्ष करुन इथवर पोहोचला त्या संघर्षाची या प्रसंगी विशेष चर्चा केली जात आहे. यशस्वी जैस्वाल हे नाव आज क्रिकेटमध्ये विशेष चमकत आणि चर्चेत असले तरी, हाच खेळाडू एकेकाळी मुंबईतील आझाद मैदान येथे पाणीपूरी (Paani Puri) विकत असे.
यशस्वी जैस्वाल हा भारतीय अंडर 19 संघात सलामीवीर म्हणून खेळतो. अष्ठपैलू खेळाडू अशी त्याची ओळख आहे. प्रसारमाध्यमांनी यशस्वी जैस्वाल याची प्रतिक्रिया प्रसिद्ध केली आहे. या प्रतिक्रियेत तो म्हणतो, 'एकेकाळी मी मुंबई येथील आझाद मैदानात पाणी पुरी विकाचो. त्या वेळी मला फार वाईट वाटायचे. कारण, मैदानावर ज्या मुलांसोबत मी क्रिकेट खेळायचो तीच मुले संध्याकाळी माझ्या ठेल्यावर पाणीपुरी खायला यायची. पण, मी ते काम केले कारण त्या वेळी मला त्याची गरज होती. माझा स्वत:चा खर्च स्वत: भागविण्यासाठी मी ते काम करत असे', अशी प्रतिक्रिया यशस्वी जैस्वाल देतो.
यशस्वी जैस्वाल याच्या आतापर्यंतच्या प्रवासावर नजर टाकता वय वर्षे 13 इतके असताना तो मुंबईत आला. तो मुंबईत आला ते वर्ष होते 2013. तो मुळचा उत्तर प्रदेश राज्यातील भदोही जिल्ह्याचा रहिवासी आहे. तो मुंबईत आला तेव्हा त्याला राहायला घर नव्हते. त्यामुळे तो एका झोपडीत राहायचा. एका मुलाखतीदरम्यान त्याने सांगितले होते की, तुम्ही जेव्हा झोपडपट्टीत राहता तेव्हा तुम्हाला वीज, पाणी, बाथरुम अशा सोयी मिळतीलच असे नाही. पण, मी मुंबईला आलो होतो ते केवळ क्रिकेट खेळण्यासाठी. (हेही वाचा, IPL 2020 Auction: पॅट कमिन्स ठरला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा परदेशी क्रिकेटर, युवा खेळाडूही झाले मालामाल)
दरम्यान, भारताच्या अंडर 19 संघाने श्रीलंका संघाविरुद्ध गेल्या वर्षी 144 धावांनी पराभव केला होता. या विजयासोबत भारताने अशिया कप सहाव्यांदा आपल्या नावावर केला होता. या सामन्यात यशस्वी जैस्वाल याने 85 धावांची दमदार खेळी केली होती. सलामिला आलेल्या जैस्वाल याने बिनबाद 85 धावा ठोकल्या होत्या. या टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो अव्वल खेळाडू ठरला होता.