IPL 2020 Auction: पॅट कमिन्स ठरला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा परदेशी क्रिकेटर, युवा खेळाडूही झाले मालामाल
ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स आणि आरोन फिंच (Photo Credit: Getty Images)

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) च्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स (Pat Cummins) याने जोरदार पाऊस पाडला. कमिन्ससाठी दिल्ली कॅपिटल आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात जोरदार झुंज झाली. नंतर कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यामध्ये सामील झाले आणि त्यांनी 15.50 कोटींची मोठी रक्कम देऊन कमिन्सला संघात शामिल केले. यासह, कमिन्स बेन स्टोक्स याला पछाडत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महाग परदेशी खेळाडू बनला. राईजिंग पुणे सुपरगिजंट्सने स्टोक्सला 14.50 कोटींमध्ये खरेदी केले होते. आयपीएलच्या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू होण्यासाठी कमिन्सला युवराजला सिंह याला मागे सोडण्याची संधी होती परंतु त्याने ती गमावली. युवराजला दिल्ली डेअरडेव्हिल्सने 16 कोटीमध्ये खरेदी केले होते. इतकाच नाही, तर यंदा भारतीय खेळाडूंना नाही तर चक्क विदेशी खेळाडूंसाठी फ्रेंचाइझींमध्ये टक्कर पाहायला मिळाली. (IPL 2020 Auction: पॅट कमिन्स, आरोन फिंच, ग्लेन मॅक्सवेल यांच्यासाठी लागली सर्वाधिक बोली, यूजर्सने Memes शेअर करत दिल्या मजेदार प्रतिक्रिया, पाहा Tweets)

कमिन्सव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचाच ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याला किंग्स इलेव्हन पंजाबने 10.75 कोटी, क्रिस मॉरिस (Chris Morris) याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 10.00 कोटी, आपल्या सॅल्यूट स्टाईलने सर्वांना प्रभावित केलेल्या शेल्डन कोटरेलला (Sheldon Cottrell) पंजाबने 8.50 कोटी, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नॅथन कोल्टर-नाईल (Nathan Coulter-Nile) याला मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 8 कोटींसारखी मोठी रक्कम देऊन संघात समाविष्ट केले. यांशिवाय,इंग्लंडचा विश्वचषक विजेता करणाधार इयन मॉर्गन (Eoin Morgan), ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच (Aaron Finch), इंग्लंडचा सॅम करन (Sam Curran) यांनाही कोटींची रक्कम देऊन खरेदी केले. दरम्यान, भारतीय खेळाडूंपैकी पियुष चावला (Piyush Chawla) सध्या सर्वात महागडा ठरला. पियुषला चेन्नई सुपर किंग्जने 6 कोटी 75 लाखांच्या बोलीसह खरेदी केले.

दुसरीकडे, या लिलावात सर्वांचे लक्ष लागून होते ते भारताच्या युवा  खेळाडूंकडे. भारतीय खेळाडूंमध्ये रहस्यमय गोलंदाज वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy), यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal), अंडर-विश्वचषकसाथीचा कर्णधार प्रियम गर्ग (Priyam Garg) आणि विराट सिंह (Virat Singh) यासारख्या खेळाडूंना मोठी रक्कम देऊन खरेदी करण्यात आले. यामध्ये वरूनला 4 कोटींमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने खरेदी केले. त्याला गेल्या वर्षी किंग्ज इलेव्हनने 8.4 कोटी विक्रमी रक्कम देऊन विकत घेतले परंतु क्वचितच मैदानात उतरला.

पाहा भारताच्या अनकॅप्ड खेळाडूंना कोणी आणि किती रक्कमेत केले खरेदी

वरुण चक्रवर्ती 4कोटी- (कोलकाता नाईट रायडर्स)

यशस्वी जयस्वाल 2.40- (राजस्थान रॉयल्स)

रवी बिश्नोई 2.00 कोटी- (किंग्स इलेव्हन पंजाब)

प्रियम गर्ग 1.90 कोटी- (सनरायझर्स हैदराबाद)

विराट सिंह 1.90 कोटी-(सनरायझर्स हैदराबाद)