WTC Final 2021: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी ‘विराटसेना’ वेळेपूर्वीच होणार रवाना, न्यूझीलंडशी करणार दोन हात
भारत विरुद्ध न्यूझीलंड (Photo Credit: IANS)

WTC Final 2021: कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) दुसर्‍या लाटेमुळे झालेल्या नुकसानीमुळे भारतातून येणाऱ्या प्रवाशांना इंग्लंडने (England) 'रेड लिस्ट'मध्ये घातल्यानंतर विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वातील टीम इंडिया (Team India) आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) अंतिम सामन्यासाठी वेळेपूर्वीच इंग्लंड दौऱ्यासाठी रावाना होण्याची शक्यता आहे. कर्णधार कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया साऊथॅम्प्टन (Southampton) येथे होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात न्यूझीलंडशी (New Zealand) दोन हात करेल. न्यूझीलंड आणि भारतीय संघातील हा सामना 18 जूनपासून खेळला जाणार आहे. भारतात प्राणघातक कोविड-19 (COVID-19) च्या वाढत्या प्रकोपानंतर ब्रिटिश सरकारने एप्रिल महिन्यात प्रवाशांच्या 'रेड लिस्ट' मध्ये भारताचे नाव सामील केले होते. अशा प्रकारे, सरकार-मान्यताप्राप्त हॉटेल्समध्ये अनिवार्य क्वारंटाईन पूर्ण झाल्यानंतर देशातील नागरिकांना प्रवेश दिला जाईल. (World Test Championship 2021 Final: टीम इंडियासाठी WTC फायनलसाठी ही ठरू शकते सर्वात मोठी डोकेदुखी, न्यूझीलंड अष्टपैलूने केले उघड)

Sports Tak ने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेमुळे प्रवासी निर्बंधामुळे ‘विराटसेना’ महिन्याच्या शेवटी इंग्लंडसाठी रवाना होऊ शकते अशी माहिती मिळाली आहे. अशा स्थितीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) प्रवास आणि क्वारंटाईन मार्गदर्शक तत्त्वांसाठी सरकारी परवानग्या मिळवण्यासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी अंतिम संघ लवकरच घोषित करेल. यापूर्वी टीम इंडिया जून महिन्याच्या सुरुवातीला इंग्लंडला जाणे अपेक्षित होते. दरम्यान, भारतीय तुकडीतील सदस्यांना हिरवा कंदील मिळण्यापूर्वी त्यांना क्वारंटाईन ठेवले जाईल व अनिवार्य कोरोना टेस्ट घेतली जाईल. इंग्लंड दौर्‍यावर जाण्यासाठी भारतीय संघाने जंबो पथक घेऊन जाणे अपेक्षित आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध ऑगस्ट महिन्यात द्विपक्षीय मालिकेअंतर्गत पाच कसोटी सामने देखील खेळणार आहे.

दुसरीकडे, कर्णधार केन विल्यमसनसह आयपीएलसाठी भारतात आलेले न्यूझीलंडचे क्रिकेटपटू इंग्लंडला जाण्यापूर्वी किमान 10 मे पर्यंत भारतातच राहू शकतात, असे त्यांच्या संघटनेच्या प्रमुखांनी बुधवारी जाहीर केले. विल्यमसन शिवाय, ब्रिटनला जाणाऱ्या संघात ट्रेंट बोल्ट, काईल जेमीसन, मिचेल सॅंटनर, क्रिस डोनाल्डसन (ट्रेनर), टॉमी सिमसेक (फिजिओ) यांच्यासह लोकी फर्ग्युसन, जिमी नीशम आणि फिन अ‍ॅलन यांचा समावेश आहे. इंग्लंड-न्यूझीलंड संघात 2 जूनपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे.