Women's T20 World Cup 2020: ब्रिस्बेनमध्ये भारताचा थरारक विजय, वेस्ट इंडिजविरुद्ध 2 धावांनी जिंकला पहिला सराव सामना
भारत महिला क्रिकेट (Photo Credit: Getty)

21 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी महिला टी-20 विश्वचषकचे (Women's World Cup) आयोजन केले जाणार आहे. यजमान ऑस्ट्रेलिया आणि भारत संघ पहिल्या सामन्यात आमने-सामने येतील. या मेगा स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियामधील परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी सर्व संघ सराव सामने खेळत आहेत. यामध्ये भारतीय महिला संघ (India Women's Cricket Team) आणि वेस्ट इंडीज (West Indies) संघात 18 फेब्रुवारी रोजी सराव सामना खेळला गेला ज्यात टीम इंडियाने 2 धावांनी विजय मिळविला. या सामन्यात भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात टीम इंडियाने अत्यंत निराशाजनक फलंदाजी केली. एकही महिला फलंदाज मोठा डाव खेळू शकली नाही. शेफाली वर्मा (Shafali Verma) 12 आणि स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) 4 धावा करून पहिल्या विकेटसाठी केवळ 16 धावांची भागीदारी केली. नियमित अंतराने विकेट पडल्याने भारताची धावांची गती वाढू शकली नाही. कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) 11 धावा करून माघारी परतली. दीप्ती शर्मी 21, शिखा पांडे नाबाद 24 धावा केल्या. भारताला यापूर्वी पाकिस्तानविरुद्ध सराव सामना खेळायचा होता, मात्र तो पावसामुळे रद्द करण्यात आला. (Women's T20 World Cup 2020 Schedule: आयसीसी टी-20 विश्वचषक 2020 चे भारतीय महिला टीमचं शेड्यूल, सामने कधी आणि कुठे होणार जाणून घ्या)

टीम इंडियाने पहिले फलंदाजी करत निर्धारित 20 ओव्हरमध्ये 107 धावा केल्या. शिखाने मधल्याफळीत चांगली बॅटिंग करत 16 चेंडूत नाबाद 24 धावा केल्या. तिने भारताकडून सर्वाधिक धावा केल्या. जेमीमाह रॉड्रिग्जचा खराब फॉर्म कायम आहे आणि ती खातं न उघडताच आऊट झाली. पूजा वस्त्राकरने 13 तर तानिया भाटियाने 10 धावांचे योगदान दिले. वेस्ट इंडिजकडून शमीला कोनेल आणि अनीसा मोहम्मद यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरात विंडीजचा संघ 20 ओव्हरमध्ये सात विकेट गमावून 105 धावा करू शकला. भारताच्या गोलंदाजी संघाने 107 धावांचे यशस्वीरित्या बचाव करत चांगली कामगिरी बजावली. भारताकडून पूनम यादवने तीन गडी बाद केले. विंडीजची सलामी फलंदाज ली-ऐन किर्बी ने 42 धावांचा डाव खेळला आणि टीमला चांगली सुरुवात करून दिली. हेले मॅथ्यू 25 धावा केल्या. यानंतर कोणीही डाव सांभाळू शकली नाही.

पूनमशिवाय शिखाने 1, दीप्तीने 1, हरमनप्रीतने 1 गडी बाद केले. चांगल्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने 2 धावांनी शानदार विजय नोंदविला. दरम्यान, मागील टी-20 विश्वचषकबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसारख्या संघांना हरवून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता पण यजमान इंग्लंडच्या हातून 8 विकेट्सच्या पराभवाने भारताचे स्वप्न भंग झाले.