
Women's T20 Challenge 2020: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात सुपरनोव्हासने (Supernovas) पहिले फलंदाजी करून दिलेल्या 127 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात मिताली राजच्या वेलॉसिटी (Velocity) संघाने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमवून 129 धावांपर्यंत मजल मारली आणि 5 विकेटने सामना जिंकला. वेलॉसिटीसाठी वेदा कृष्णमूर्ती (Veda Krishnamurthy), सुषमा वर्मा (Sushma Verma) आणि सुने लूस (Sune Luus) यांनी महत्वाची भूमिका बजावली आणि महिला टी-20 चॅलेंजमध्ये संघाला विजयी सुरुवात करून दिली. सुषमाने 34, वेदाने 29 आणि सुने लूसने नाबाद 37 धावांचे योगदान दिले. वेलॉसिटीने टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाजांच्या हल्ल्यासमोर सुपरनोव्हास चमारी अटापट्टू आणि हरमनप्रीत कौरने फटकेबाजीने समाधानकारक धावसंख्या गाठून दिली, पण ती विजयासाठी पुरेशी सिद्ध झाली नाही. दुसरीकडे, फलंदाजीत फेल झालेल्या सुपरनोव्हाससाठी गोलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली. आयबोंगा खाकाने सर्वाधिक 2 तर शशिकला सिरिर्डेने आणि राधा यादव यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. (Women's T20 Challenge 2020: वेलॉसिटी गोलंदाजांनी सुपरनोव्हासच्या धावगतीला घातली वेसण, मिताली राजच्या टीमसमोर 127 धावांचे लक्ष्य)
लक्ष्याचा पाठलाग करताना वेलॉसिटीची सुरुवात खराब झाली आणि ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर डॅनियल व्याट भोपळा न फोडता माघारी परतली. त्यानंतर शेफाली वर्मा देखील 17 धावांवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाली. कर्णधार मिताली राज काही खास कामगिरी करू शकली नाही आणि 7 धावा करून माघारी परतली. वेदा कृष्णमूर्ती एकाबाजूने लढा देत राहिली. वेदाने सुषमा वर्मासह डाव सांभाळला आणि संघाला विजयाच्या जवळ नेले. पण, वेदा राधा यादवच्या चेंडूवर 29 धावा करून झेलबाद झाली. सुषमाला मोक्याच्या क्षणी पूनम यादवने झेलबाद केले. सुषमाने 34 धावा केल्या. अखेरीस सुने लूस आणि शीख पांडे यांनी संघाचा विजय निश्चित केला. वेलॉसिटीतर्फे सुषमाने 33 चेंडूत 34 धावांची शानदार खेळी साकारली. यादरम्यान तिने दोन षटकारही ठोकले. पण संघाचा विजय लुसने निश्चित केला. लुसने 21 चेंडूंत नाबाद 37 धावा केल्या. या डावात लुसेने चार चौकार आणि एक षटकार लगावला.
यापूर्वी टॉस गमावल्यानंतर आणि प्रथम फलंदाजीनंतर सुपरनोव्हासची चांगली सुरुवात झाली, पण नंतर वेलॉसिटी गोलंदाजीपुढे ते निरुत्तर दिसले आणि त्यांना 126 धावांपर्यंतच मजल मारता आली. सुपरनोव्हाससाठी चमारी अटापट्टूने 44, कर्णधार हरमनप्रीत कौरने 33 आणि शशिकला सिरिवर्डेनने 18 धावा केल्या. दुसरीकडे, वेलॉसिटीसाठी एकता बिष्टने सर्वाधिक 3, तर जहानार आलम आणि लेघ कासपेरेक यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.