सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली (Photo Credit: Getty)

भारतीय संघाचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) निश्चितपणे सर्वात महान फलंदाज आहे. मास्टर ब्लास्टर ‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखला जातो. कसोटी तसेच वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा सचिन, त्याच्या फलंदाजीच्या तंत्रज्ञानासाठी ओळखला जात होता. सचिन आणि माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांची जोडी, भारतीय संघाची (Indian Team) आजवरची वनडे क्रिकेटमधील सर्वोत्तम सलामीची जोडी होती असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. 90 च्या दशकात हे क्रिकेटपटू भारतीयांच्या गळ्यातले ताईत होते. सचिन, सौरव, राहुल द्रविड, व्हीव्हीस लक्ष्मण यांची फलंदाजी पाहण्यासाठी लोकं टिव्हीसमोर ठाण मांडून बसायचे. परंतु कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात 1997 च्या वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यावर सचिन आणि सौरव यांच्यात एक वाद झाला होता. त्यावेळी सचिन कर्णधापदावर होता. दौऱ्यावर एकेवेळी तेंडुलकरने ‘दादा’ला तुझं करिअर संपवेन अशी धमकी दिली होती. ('मला वाटलं मस्करी करतोय'! जेव्हा सचिन तेंडुलकरने इंग्लंडच्या 'या' खेळाडूला दिली होती मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची ऑफर)

बार्बाडोस कसोटीत भारताला वेस्ट इंडिजकडून मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. विजयसही 120 धावांची 81 धावांवर ऑल आऊट झाली आणि भारताला 38 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. सचिनला यावेळी चांगलाच धक्का बसला होता. त्याला धीर देण्यासाठी गेलेल्या सौरवला यावेळी तेंडुलकरच्या रागाचा सामना करावा लागला. “सचिनने त्यावेळी सर्व खेळाडूंना ड्रेसिंग रुममध्ये उपदेशाचे धडे दिले. त्याला स्वतःच्या क्षमतेवरही शंका येत होती. यावेळी सौरव सचिनला धीर द्यायला गेला असतान सचिनने त्याला उद्यापासून सकाळी माझ्यासोबत धावायला यावं लागेल, तयार रहा असं सांगितलं. मात्र गांगुली सचिनसोबत धावायला गेलाच नाही. त्यामुळे संतापलेल्या सचिनने गांगुलीला, असा हलगर्जीपणा चालणार नाही. तुझी बॅग घेऊन घरी पाठवेन आणि कारकिर्द संपवेन अशी धमकी दिली होती.” Sports Tak च्या यू-ट्युब व्हिडीओमध्ये क्रीडा पत्रकार विक्रांत गुप्ता यांनी हा किस्सा सांगितला

दरम्यान, सचिनच्या बोलण्याचं सौरवने कधीच वाईट वाटून घेतलं नाही. तत्कालीन भारतीय कर्णधाराच्या कठोर शब्दांमुळे क्रिकेटबद्दल गांगुलीचा दृष्टिकोन कसा बदलला आणि त्याने आपल्या तंदुरुस्ती व क्षमता यावर कठोर परिश्रम करण्यास सुरुवात केली. गुप्ता पुढे म्हणाले की, जर पराभव झाला नसता तर सचिनने कर्णधारपद कायम राखले असते आणि ते भारताचे एक महान कर्णधार बनले असते.