Umesh Yadav (Photo Credit: ESPN)

तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानावर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला होता. दरम्यान, मोहम्मद सिराज फाईन लेगला सीमा रेषेवर क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी सिडनीच्या मैदानावर मद्याच्या अमलाखाली असलेल्या काही समर्थकांनी मोहम्मद सिराजवर वर्णद्वेषी शेरेबाजी केली होती. याप्रकरणी सर्वच स्तरातून टीका होत आहे. यातच भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव यांनीदेखील यावर संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच सिडमी मैदानात अपमानास्पद कृत्य करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्याने अधिकाऱ्यांकडे केली आहे.

सिडनीच्या मैदानावरील सुरक्षा अधिकाऱ्यांनी दोषी व्यक्तींना पकडण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. सिडनीच्या मैदानात 800 पेक्षा जास्त कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर कोरोनामुळे सामना पाहण्यासाठी आलेल्या 10 हजार प्रेक्षकांची सुरक्षा अधिकाऱ्याकडे माहिती आहे. मैदानातील अधिकाऱ्यांनी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. या फुटेजच्या आधारावर दोषी व्यक्तींचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती ऑस्ट्रेलियाच्या एका वृत्तपत्राने दिली आहे. हे देखील वाचा- IND vs AUS 3rd Test: कसं व्हायचं यांचं! रोहित शर्मा, हनुमा विहारी यांनी सोडले सोपे कॅच, ऑस्ट्रेलियन फलंदाजांना दिले जीवदान, पहा Video

उमेश यादव याचे ट्वीट-

यापूर्वी, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 13 वर्षापूर्वी झालेल्या कसोटी मालिकेत वर्णद्वेषी शेरेबाजीवरुन मोठा वाद झाला होता. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंहने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज अँड्रयू सायमंडसला माकड म्हटल्याचा त्याने आरोप केला होता. या आरोपाचे मैदानावर आणि मैदानाबाहेरही पडसाद उमटले. दोन्ही संघांमधील मैत्रीपूर्ण वातावरण बिघडले होते. दोन्ही देशाची क्रिकेट मंडळ, खेळाडू, माजी खेळाडू, मीडिया आणि दोन्ही देशाची सरकारे या वादामध्ये सहभागी झाली होती.