टीम इंडिया (Photo Credit: AP/PTI)

भारत आणि वेस्ट इंडिज संघात सुरु असलेल्या पहिल्या टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवसाखेर भारताने 260 धावांची आघाडी मिळवली. कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर भारताने तिसऱ्या दिवशी आपली पकड मजबूत केली आहे. पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही भारताचे आघाडीचे फलंदाज झटपद बाद झाले. चहापर्यंत भारताने 98 धावांत तीन गडी गमावले होते. मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा पुन्हा अपयशी ठरले. तर केएल राहुलसुद्धा लवकर बाद झाला. भारताची अवस्था 3 बाद 81 अशी झाली होती. त्यानंतर कोहली आणि रहाणे यांनी शतकी भागिदारी केली. तिसऱ्या दिवसाखेर कोहली 51 तर रहाणे 53 धावांवर खेळत होते. (IND vs WI 1st Test: सचिन-सौरव जोडीला मागे सारत विराट कोहली-अजिंक्य रहाणे यांची टेस्टमध्ये रेकॉर्ड कामगिरी)

भारत आणि वेस्ट इंडिजमधील पहिल्या टेस्टच्या चौथ्या दिवसाचा सामना तुम्ही ऑनलाइन Sony Ten SD/HD आणि Sony Ten 3 SD/HD आणि SonyLiv Online वर पाहु शकता.

दरम्यान, भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट खेळी केली आणि विंडीजचा पहिला डाव 222 धावांवर संपुष्टात आणला आणि भारताला 75 धावांची आघाडी मिळवून दिली. भारतासाठी इशांत शर्मा याने 5 तर मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह याने एक गडी बाद केला. विंडीजसाठी कर्णधार जेसन होल्डर आणि मिगेल कमिन्स यांनी नवव्या विकेटसाठी 41 धावांची भागिदारी केली आणि संघाला 200 धावांचा टप्पा गाठण्यास सहाय्य केले. होल्डर 65 चेंडूत पाच चौकारांसह 39 धावा करत बाद झाला. टीम इंडियाचा पहिला डाव संपुष्टात आल्यानंतर गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. विंडीजकडून रोस्टन चेज याने सर्वाधिक 48 धावा केल्या.  तर, तिसऱ्या दिवसाखेर विंडीजच्या चेजने 42 धावांत 2 गडी बाद केले.