वसीम अक्रमने सांगितली 1999 दिल्ली टेस्ट सामन्यातली आठवण, अनिल कुंबळे कडून आऊट होण्यापूर्वी वकार युनुसला दिल्या 'या' सूचना
अनिल कुंबळे, वासिम अक्रम (Photo Credit: Getty)

आंतराष्ट्रीय कसोटी आणि वनडे सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम भारताचा (India) माजी दिग्गज फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे (Anil Kumble) यांच्या नावावर आहे. हे विक्रम एक दिवस मोडले जाऊ शकतात पण,  कुंबळेचा असा एक विक्रम आहे जो आजीवन टिकून राहील तर तो त्यानेएकाच डावात दहा विकेट्स मिळवण्याचा केलेला पराक्रम. 1999 मध्ये नवी दिल्लीतील फिरोजशाह कोटला (ज्याला सध्या अरुण जेटली स्टेडियम म्हटले जाते) येथे कमान प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध ऐतिहासिक मालिकेच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात कुंबळेने चमत्कारिक पराक्रम गाजवला होता. आजही तो क्षण प्रत्येकी भारतीय क्रिकेट प्रेमींच्या स्मरणात असेल. 1999  मध्ये कुंबळे कसोटी सामन्याच्या डावात 10 गडी बाद करणारा फक्त दुसरा गोलंदाज ठरला. कुंबळेचा अंतिम बळी ठरलेल्या वसीम अक्रम (Wasim Akram) याने नुकत्याच झालेल्या युट्यूब वाहिनीवरील आकाश चोपडा (Aakash Chopra) समवेत एका व्हिडिओमध्ये त्याला डिसमिस करण्यापूर्वीची एक घटना सांगितली. (VIDEO: सचिन तेंडुलकर याच्या बॅटने शाहिद आफ्रिदी ने मोडला होता वर्ल्ड रेकॉर्ड, जाणून घ्या आफ्रिदीपर्यंत सचिनची बॅट पोहचण्याची रंजक कहाणी)

विक्रमी दिवस आठवत अक्रम म्हणाला की त्याने कुंबळेला 10 वी विकेट नाकारण्याचा कधीही विचार केला नाही परंतु तो आपली विकेट होऊ इच्छित नव्हता. “नाही. हे स्पोर्ट्समनच्या स्पिरीटच्या विरोधात आहे (मुद्दाम दुसऱ्या गोलंदाजाकडून बाद होणे). मी वकार युनूसला (Waqar Younis) सांगितले की तू अनिल कुंबळे खेळ, मी त्याच्याकडून बाद होणार नाही. कर्णधार म्हणून मी वकारला सांगितले की आपला सामान्य खेळ खेळा आणि श्रीनाथ (जवागल) विरुद्ध शॉट्स खेळा. पण, दुर्दैवाने त्याचा पहिला चेंडू बॅटच्या आतल्या टोकाला लागला आणि मी आऊट झालो." डावात 10 फलंदाज बाद करणार्‍या जिम लेकर पहिले गोलंदाज होते. 1956 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक कसोटी सामन्यात त्यांनी 19 गडी बाद केले होते.

या सामन्यात भारताने दिलेल्या 420 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत पाकिस्तानने एकही विकेट न गमावता 100 धावा केल्या. कुंबळेने शाहिद आफ्रिदीची पहिली विकेट घेत इतिहास रचला. कुंबळेने पहिल्या सहा विकेट्स 14.1 ओव्हरमध्ये आणि अन्य चार पुढील 22 ओव्हरमध्ये घेतल्या. यापूवी, पाकिस्तानने चेन्नईमधील पहिली टेस्ट 12 धावांनी जिंकली होती.