भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) कर्णधार विराट कोहली, जितका त्याच्या आक्रमक खेळीसाठी लोकप्रिय आहे तितकेच त्याचे वर्कआऊट रुटीनदेखील प्रसिद्ध आहे. वर्ल्डकपच्या भारत-पाक सामन्यावेळी पाकिस्तान हरल्यानंतर सर्वत्र विराटच्या फिटनेसचीच चर्चा होती. याधीही आपण अनेकवेळा विराटचे जिममधील व्हिडीओ आणि फोटोज पहिले आहेत. नुकताच विराटने आपल्या इंस्टाग्रामवर एक वर्कआऊटचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ एकाच वेटलिफ्टिंगचा बिफोर आफ्टर व्हिडीओ आहे. 3 वर्षांपूर्वी आपण ज्या प्रकारे वेटलिफ्टिंग करत होतो त्यामध्ये आता किती बदल आहे ते विराट दाखवून देऊ इच्छितो.
हा व्हिडीओ शेअर करताना विराट लिहितो, ‘वजन उचलण्यापूर्वी त्याचे तंत्र आत्मसात करण्यासाठी वेळ द्या. नियमितपणे सराव करणे, आपण जे करत आहोत त्या तंत्रावर सतत लक्ष केंद्रित करणे यामुळे मी फक्त वर्कआऊटचे तंत्रच आत्मसात केले नाही, तर माझी गतिशीलता आणि शरीराची पूर्ण शक्ती देखील सुधारली आहे.’ पुढे विराट म्हणतो ‘म्हणून काहीतरी नवीन शिकण्यास नेहमी संयम बाळगा. तंदुरुस्त रहा निरोगी रहा.’ (हेही वाचा: वेस्ट इंडिज दौऱ्याआधी विराट कोहली जिममध्ये करतोय कठोर परिश्रम, पहा Video)
अशा प्रकारे एका साध्या व्हिडीओद्वारे विराटने फार महत्वाचा सल्ला त्याच्या चाहत्यांना दिला आहे. दरम्यान, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली असलेला भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौर्यावर आहे. टी -20 मालिकेत भारताने वेस्ट इंडिजला 3-0 ने पराभूत केले. अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पंड्या याला 'मॅन ऑफ द सीरिज' ही पदवी देण्यात आली. गुरुवारी, भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पहिला एकदिवसीय सामना खेळला जाईल.