पाकिस्तानच्या माजी गोलंदाज राणा नावेद (Photo Credit: Getty)

यूनुस खान (Younis Khan) याच्या कर्णधारपदावर नाराज असल्याने राष्ट्रीय क्रिकेट संघातील अनेक ज्येष्ठ खेळाडूंनी युएईमध्ये न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) 2009 च्या वनडे मालिकेमध्ये मुद्दाम खराब कामगिरी केल्याचा आरोप पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज राणा नावेद-उल-हसन (Rana Naved ul Hassan) यांनी केला आहे. पाकिस्तानकडून (Pakistan) नऊ आंतरराष्ट्रीय कसोटी, 74 एकदिवसीय आणि चार टी-20 सामने खेळणार्‍या 42 वर्षीय राणाने त्या दौर्‍यावर विशेषत: दोन वनडे सामन्यांविषयी खुलासा केला. ते म्हणाले की, त्यावेळी यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात ज्येष्ठ खेळाडू कर्णधार युनूसच्या नेतृत्त्वावर नाराज होते, त्यामुळे ते सामना गमावण्यासाठी खराब कामगिरी करीत होते. "2009 मध्ये युएईमध्ये न्यूझीलंडविरुद्ध आम्ही दोन वनडे सामने गमावले होते, कारण काही खेळाडू जाणूनबुजून चांगली कामगिरी करत नव्हते," असे राणा यांनी स्थानिक वृत्तवाहिनीला सांगितले. ('त्यांच्यासाठी वाईट वाटायचे'; इमरान खान यांनी टीम इंडियासाठी व्यक्त केला सहानुभूती, पाहा काय म्हणले पाकिस्तानी पंतप्रधान)

वेगवान गोलंदाज म्हणाला की, कर्णधाराविरूद्ध ज्येष्ठ खेळाडूंच्या कटाचा भाग होऊ इच्छित नसल्याने आपण त्या दौर्‍यापासून माघार घेतली होती. 2009 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतरच काही खेळाडू यूनुसवर रागावले होते आणि कथितपणे सर्वांनी एकत्रितपणे यूनुसला काढून टाकण्याचा प्रयत्न केला होता कारण त्यांना वाटायचे की तो गर्विष्ठ आहे आणि इतरांचा अपमान करतो.

ते पुढे म्हणाले की, कर्णधारपद मिळाल्यानंतर यूनुस बदलला होता आणि संघात असे काही ज्येष्ठ खेळाडू होते ज्यांना आपले लक्ष्य साध्य करायचे होते. ते म्हणाले, “यूनुसविरूद्ध बंडखोरी नव्हती. तो एक चांगला क्रिकेटपटू होता. मी त्यांच्याबरोबर खेळलो, पण कर्णधार झाल्यानंतर त्यांच्यात काही बदल झाले. याखेरीज दुसरे काही नव्हते.'' नावेद पुढे म्हणाले की या प्रकरणात पाकिस्तान क्रिकेटच्या मोठ्या नावांचा समावेश आहे. ते म्हणाले, "आम्हा सर्वांना एका खोलीत बोलावले होते आणि निष्ठा शपथ घेतली. त्या खोलीत पाकिस्तान क्रिकेटची काही मोठी नावे होती. मी त्यांचे नाव घेतल्यास त्याला राग येईल."