
आयसीसी (ICC) अंडर-19 क्रिकेट विश्वचषक (World Cup) 2002 ची स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत 17 जानेवारी, 2020 पासून सुरू होईल. अंडर-19 विश्वचषकस्पर्धेची ही 13 वी आवृत्ती आहे. दर दोन वर्षांनी आयसीसी द्वारे ही स्पर्धा खेळवली जाते. यंदाच्या आयसीसी अंडर-19 विश्वचषकमध्ये एकूण 16 संघ भाग घेतील. नवोदित क्रिकेटपटूंसाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी ही स्पर्धा एक महत्त्वाचा टप्पा मनाली जाते. विराट कोहली, केन विल्यमसन, बेन स्टोक्स, जो रूट यांच्यासारखे सध्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रसिद्ध खेळाडू या स्पर्धेतून निघाले आहेत. आयसीसी अंडर-19 विश्वचषकमधील 16 सहभागी देशांना प्रत्येकी चार संघांच्या गटात विभागले गेले आहे. (ICC U19 World Cup 2020 India Schedule: भारत अंडर-19 संघाचे संपूर्ण वेळापत्रक, टीम आणि सामन्यांचे ठिकाण, जाणून घ्या)
भारतीय संघात उत्कृष्ट युवा खेळाडू जे पुन्हा एकदा भारतालाही स्पर्धा जिंकण्यास सक्षम आहेत. प्रियम गर्ग या युवा भारतीय संघाचे या सापरधेत नेतृत्व करेल. भारत यंदाची ही स्पर्धा जिंकण्यासाठी आवडीचा संघच नाही तर, गतविजेता संघही आहे. पृथ्वी शॉच्या नेतृत्वात, न्यूझीलंडमध्ये भारताने 2018 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. दरम्यान, अंडर-19 विश्वचषक च्या अगोदर आपण पाहूया असे काही रेकॉर्डस् जे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे.
सर्वाधिक विजेतेपद
भारताने चार वेळा अंडर-19 विश्वचषक जिंकला आहे, जे कोणत्याही संघाकडून सर्वाधिक विजय आहे. 2000 ध्ये मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखालील संघाने ही स्पर्धा जिंकली होती, त्यानंतर, 2008, 2012, आणि 2018 वर्षी भारताने अनुक्रमे विराट कोहली, उन्मुक्त चंद आणि पृथ्वी शॉ यांच्या नेतृत्वात ही स्पर्धा जिंकली.
अंडर-19 वर्ल्ड कपमधील सर्वाधिक धावा
सध्या इंग्लंडचा मर्यादित षटकांचा कर्णधार इयोन मॉर्गन याने 13 सामन्यांत 606 धावा केल्या आहेत. मॉर्गन दोन अंडर-19 विश्वचषकांमध्ये (2004 आणि 2006) खेळला आहे. मात्रं, त्याने दोन्ही आवृत्तीमध्ये आयर्लंडचे प्रतिनिधित्व केले. या यादीत पाकिस्तानचा बाबर आझम 585 धावांनी दुसर्या क्रमांकावर आहे. 2004 च्या स्पर्धेच्या आवृत्तीत शिखर धवन याने एकाच अंडर-19 विश्वचषकमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला होता. धवनने केवळ सात डावात 505 धावा केल्या होत्या.
अंडर-19 विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्या
लिंकन येथे आयसीसी अंडर-19 2018 च्या विश्वचषकमध्ये श्रीलंकेच्या हसिथा बॉयगोडाने 152 चेंडूत केनियाविरुद्ध सर्वाधिक 191 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडच्या जाकोब भुलाने त्याच संघाविरुद्ध याच आवृत्तीत 180 धावा केल्या आणि अंडर-19 स्पर्धेत फलंदाजाकडून ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.
अंडर-19 विश्वचषकातील सर्वाधिक विकेट्स
ऑस्ट्रेलियाच्या मोइसेस हेनरिक्सने 2004 आणि 2006 च्या स्पर्धेत 13 सामन्यांत 27 गडी बाद केले होते. आयर्लंडचा ग्रेग थॉम्पसन 27 विकेट्ससह दुसर्या स्थानावर आहे पण त्याने 19 सामन्यांमधून हे विकेट्स घेतल्या होत्या.
अंडर-19 विश्वचषकात विकेटकीपरने केलेले सर्वाधिक डिसमिसल्स
अॅडम क्रोस्टवेट याच्या नावावर अंडर-19 स्पर्धेमध्ये विकेटकीपरने सर्वाधिक बाद केलेल्याचा विक्रमाची नोंद आहे. 2002 आणि 2004 च्या स्पर्धेत त्याने 20 कॅचेस आणि 8 स्टंपिंग्ज केले होते.
अंडर-19 विश्वचषकातील संघाची सर्वोच्च धावसंख्या
2002 च्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने केनियाविरुद्ध सामन्यात 50 षटकांत ऑस्ट्रेलियाने 480/6 ची सर्वोच्च धावसंख्या उभारली होती. स्पर्धेच्या इतिहासातील कोणत्याची संघाने उभारलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
विश्वचषकातील संघाची सर्वात कमी धावसंख्या
2004 च्या संस्करणात स्कॉटलंड चाॅटोग्राम येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त 22 धावांवर ऑलआऊट झाला होता. हे अंडर-19 स्पर्धेच्या इतिहासातील संघाने केलेली सर्वात कमी धावसंख्या आहे.
दरम्यान, 2020 आयसीसी अंडर-19 विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत खेळला जात आहे. या स्पर्धेचा पहिला सामना 17 जानेवारी रोजी दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान 19 वर्षांखालील या विश्वचषकात भारताला गट-ए मध्ये स्थान देण्यात आले आहे, ज्यात जपान, न्यूझीलंड आणि श्रीलंका या देशांचा समावेश आहे.