Top Sporting Moments of 2020: 2020 मधील क्रिकेटचे 'हे' क्षण कायम राहतील चाहत्यांच्या आठवणीत
भारत महिला क्रिकेट संघ/ भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट (Photo Credit: Getty, PTI)

Top Sporting Moments of 2020: कोरोना व्हायरसने प्रभावित झालेल्या यंदाच्या वर्षात क्रीडा स्पर्धांवरही प्रभाव पडला. अंडर-19 वर्ल्ड कपपासून (U19 World Cup) आयसीसी स्पर्धांना सुरुवात झाली, त्यांनंतर ऑस्ट्रेलियामध्ये महिला टी-20 वर्ल्ड कप (Women's T20 World Cup) देखील आयोजित करण्यात आले मात्र मार्च महिन्यात जगभरात कोविड-19 चा प्रभाव वाढला ज्यामुळे अनेक क्रीडा स्पर्धा मध्यभागीच थांबवण्यात आल्या, तर अन्य पुढे ढकलण्यात आल्या आणि संपूर्ण जग लॉकडाऊन झाले. टोकियो ऑलिम्पिक ते ऑस्ट्रेलियामधील (Australia) टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा देखील पुढे ढकलण्यात आल्या. मात्र, हळूहळू काळजी घेत फुटबॉल, क्रिकेटपासून जगभरात क्रीडा स्पर्धा पुन्हा आयोजित केल्या जात आहे. यंदाच्या वर्षात कोरोनाने प्रभावित झालेल्या भारतीय क्रीडा विश्वात काही महत्वाच्या घटना घडल्या आहेत ज्याबद्दल आपण आजच्या आपल्या या लेखात जाणून घेणार आहोत. (Year-Ender 2020: कोबे ब्रायंट याच्यापासून ते चेतन चौहान यांच्यापर्यंत, क्रीडा विश्वातील 'या' प्रमुख खेळाडूंची यंदा जीवनातून एक्झिट)

अंडर-19 वर्ल्ड कप

दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या अंतिम सामन्यात फेब्रुवारी महिन्यात बांग्लादेशने बलाढ्य भारताचा पराभव करत पहिल्यांदा आयसीसी अंडर-19 विश्वचषकवर आपले नाव कोरले. यामुळे बांग्लादेशच्या ज्येष्ठ राष्ट्रीय संघाची संघर्षानंतर उज्ज्वल भविष्याची आशा पुन्हा जागृत केली.

महिला टी-20 वर्ल्ड कप

महिला दिनी खेळल्या गेलेल्या आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला आणि मेलबर्नच्या विक्रमी 86,174 प्रेक्षकांसमोर आपले वर्चस्व कायम ठेवले. दुसरीकडे, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारतासाठी हा पहिला टी-20 विश्वचषक फायनल सामना होता, ज्यात त्यांनी चांगली कामगिरी केली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे कमबॅक

मार्च महिन्यात कोरोना व्हायरसमुळे प्रभावित झालेले क्रिकेटची इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी सामन्याने पुन्हा सुरुवात झाली. 129 दिवसांच्या ब्रेकनंतर क्रिकेटला पुन्हा सुरुवात झाली ज्यात क्रिकेटच्या नवीन सामान्यतेची पहिली झलक पाहायला मिळाली. क्रिकेटमध्ये नवीन नियम लागू करण्यात आले ज्यानुसार रिक्त स्टेडियम, बॉलवर लाळ वापर न करणे आणि हातमिळवणी न करणे अशा नियमांचा समावेश होता. ब्लॅक लाइव्हज मॅटर चळवळीच्या सुरुवातीची हीच ती वेळ होती.

पहिल्यांदा देण्यात आले पाच खेल रत्न

खेळ मंत्रालयाकडून पहिल्यांदा एकत्र पाच खेल रत्न पुरस्कार देण्यात आले ज्यात क्रिकेटर रोहित शर्मा, कुश्तीपटू विनेश फोगाट पॅरा-अ‍ॅथलीट मारियाप्पन थांगावेलु, टेबल-टेनिस स्टार मनिका बत्रा आणि महिला हॉकी टीमची कॅप्टन राणी रामपालचा समावेश होता. याशिवाय 27 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार आणि 13 प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात आले. कोरोना महामारीमुळे ऑनलाईन सोहळा आयोजित करण्यात आला होता ज्यात खेळाडूंनी आपल्या SAI केंद्रातून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह सोहळ्यात भाग घेतला.

मुंबई इंडियन्सचे पाचवे आयपीएल विजेतेपद

नोव्हेंबर महिन्यात मुंबई इंडियन्सने दुबई येथे रंगलेल्या फायनलमध्ये दिल्ली कॅपिटलसचा पराभव करत पाचवे आयपीएल विजेतेपद पटकावले. चेन्नई सुपर किंग्जनंतर सलग विजेतेपद मिळविणारा मुंबई दुसरा संघ ठरला. विशेष म्हणजे संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वात पाचही आयपीएल विजेतेपद जिंकले आहेत.

अ‍ॅडिलेडमधील धक्कदायक पराभव

अ‍ॅडिलेड ओव्हलमध्ये भारताला लज्जास्पद 8 विकेटने पराभव पत्करावा लागला. पराभवाच्या फरकाने नाही तर भारताचा दुसरा डाव अवघ्या 36 धावांवर गडगडला ज्याने सर्वांनाच धक्का बसला. 1974 मध्ये लॉर्ड्स येथे इंग्लंडविरुद्ध 42 धावांना मागे टाकत संघाने आतापर्यंतच्या सर्वात कमी धावसंख्येची नोंद केली.