T20 World Cup 2021 Prize Money: ऑस्ट्रेलियाच्या 13 कोटींची बक्षीस रक्कम, न्यूझीलंड खेळाडूही झाले मालामाल; जाणून घ्या टीम इंडियाला किती मिळाले
ऑस्ट्रेलिया टी-20 विश्वचषक (Photo Credit: PTI)

T20 World Cup 2021 Prize Money: क्रिकेट विश्वाला टी-20 चा नवा विश्वविजेता मिळाला आहे. दुबई येथे झालेल्या आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) 2021 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) न्यूझीलंडचा (New Zealand) पराभव करून पहिले विजेतेपद पटकावले. 2015 नंतर ऑस्ट्रेलियाने प्रथमच आयसीसी ट्रॉफी जिंकली. 6 वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाने वनडे वर्ल्ड कपचे पाचवे जेतेपद पटकावले होते. कांगारू संघाला विजयासाठी 173 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे डेविड वॉर्नर (53) आणि मिचेल मार्श (77*) यांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 7 चेंडू शिल्लक असताना गाठले. पाच वेळा एकदिवसीय चॅम्पियन्स संघाने इतिहासात पहिलेच टी-20 जेतेपद पटकावले आणि आरोन फिंचच्या (Aaron Finch) संघाने चॅम्पियन बनत 13.1 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जिंकली. टी-20 विश्वचषक 2021 ची एकूण बक्षीस रक्कम $5.6 लाख (अंदाजे 42 कोटी रुपये) ठेवण्यात आली होती. ही बक्षीस रक्कम स्पर्धेतील 16 सहभागी संघांमध्ये विभागली जाईल. (T20 WC Final: ऑस्ट्रेलियाचा विश्वचषक नायक Mitchell Marsh याचा कारनामा, पुरुष टी-20 विश्वचषक फायनल सामन्यात चोपले सर्वात वेगवान अर्धशतक)

चॅम्पियन ऑस्ट्रेलिया संघाला एकूण 13.1 कोटी रुपये, स्पर्धा जिंकण्यासाठी 11.9 कोटी रुपये आणि सुपर 12 टप्प्यातील 5 पैकी 4 लीग सामने जिंकण्यासाठी अतिरिक्त 1.2 कोटी रुपये मिळतील. दुसरीकडे, उपविजेत्या न्यूझीलंडला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी 7.15 कोटी रुपये – 5.95 कोटी रुपये आणि ऑस्ट्रेलियासारख्या सुपर 12 टप्प्यांमध्ये 4 विजय मिळवण्यासाठी अतिरिक्त 1.2 कोटी रुपये मिळतील. तसेच स्पर्धेतील इतर दोन उपांत्य फेरीतील संघ - इंग्लंड आणि पाकिस्तान - यांना प्रत्येकी $400,000 (3 कोटी) ची रक्कम मिळणार आहे. त्याशिवाय पाकिस्तानला सुपर 12 च्या टप्प्यात 5 विजय मिळवण्यासाठी एकूण 4.5 कोटी रुपये अतिरिक्त मिळतील, तर इंग्लंडला 5 पैकी 4 सामने जिंकण्यासाठी एकूण 4.2 कोटी रुपये मिळतील. दरम्यान, विराट कोहलीच्या टीम इंडियाला एकूण 1.42 कोटी रुपये - सुपर 12 टप्प्यासाठी 52 लाख आणि सुपर 12 टप्प्यांमध्ये 3 विजयासाठी अतिरिक्त 90 लाख रुपये.

तसेच ओमान, पापा न्यू गिनी, आयर्लंड आणि नेदरलँड्स हे 4 संघ होते ज्यांनी T20 विश्वचषक पात्रता सामने खेळले परंतु सुपर 12 टप्प्यासाठी पात्र ठरले नाहीत. या प्रत्येक संघाला स्पर्धेच्या पात्रता टप्प्यात जिंकलेल्या प्रत्येक विजयासाठी $40,000 (30 लाख) आणि अतिरिक्त $40,000 (30 लाख) मिळतील.