आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाशी (Australia) टक्कर होण्यापूर्वी न्यूझीलंड (New Zealand) संघाला जबरदस्त झटका बसला आहे. किवी संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज डेव्हॉन कॉनवे (Devon Conway) उजव्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे अंतिम सामन्यातून बाहेर पडला आहे. कॉनवे केवळ टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीतूनच बाहेर नाही तर भारत दौऱ्यातूनही तो बाहेर पडला आहे. अबु धाबीच्या (Abu Dhabi) शेख जायद स्टेडियमवर बुधवारी झालेल्या इंग्लंडविरुद्ध पहिल्या उपांत्य लढतीत कॉनवेला दुखापत झाली होती. न्यूझीलंडने हा सामना पाच गडी राखून जिंकून अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले. दुबई (Dubai) इंटरनॅशनल स्टेडियमवर 14 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाणार आहे आणि आता कॉनवे या सामन्यात खेळू शकणार नाही. यापूर्वी स्पर्धेपूर्वीच किवी संघातून लॉकी फर्ग्युसन दुखापतीमुळे बाहेर पडला होता. (PAK vs AUS Semi-Final, ICC T20 WC 2021: अजेय पाकिस्तानचे स्वप्न भंगले, विजयरथावर ऑस्ट्रेलियाने लावला ब्रेक; आता जेतेपदासाठी न्यूझीलंडशी गाठ)
गुरुवारी पाकिस्तानचा पाच विकेट्सने पराभव करून ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड फायनलमध्ये पोहोचल्यानंतर टी-20 वर्ल्ड कपला यंदा नवा चॅम्पियन मिळणार आहे. कॉनवेने इंग्लंडविरुद्ध 38 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 46 धावांची खेळी केली. दरम्यान, आपल्या दुखापतीसाठी कॉनवे स्वतःच जबाबदार आहे. इंग्लंडविरुद्ध सेमीफायनल सामन्यात तो बाद झाल्यानंतर डावखुऱ्या फलंदाजाने आपल्याच हातावर बॅट मारली. स्कॅनमध्ये त्याच्या उजव्या हाताच्या पाचव्या मेटाकार्पलला दुखापत झाल्याची पुष्टी झाली आहे. दरम्यान, डेव्हन कॉनवे आता भारतातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी देखील साशंक आहे.
Devon Conway has been ruled out of the @T20WorldCup Final and following tour to India with a broken right hand. Conway sustained the injury when he struck his bat immediately after being dismissed in last night’s semi-final. More Info | https://t.co/LCMOTJqmqc #T20WorldCup pic.twitter.com/JIm9o6Rhxe
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 11, 2021
किवीचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड म्हणाले, “डेव्हॉन एक उत्कृष्ट टीम-मॅन आहे आणि संघाचा एक अतिशय लोकप्रिय सदस्य आहे, त्यामुळे आम्ही सर्व त्याच्याबद्दल भावना व्यक्त करतो. त्याने बरा होण्यासाठी मायदेशी परतण्यापूर्वी उर्वरित दौऱ्यासाठी संघाला कोणत्याही प्रकारे पाठिंबा देण्याचा निर्धार केला आहे. टाइमलाइनमुळे आम्ही या विश्वचषकासाठी किंवा भारताविरुद्ध पुढील आठवड्यात होणाऱ्या T20 मालिकेसाठी बदली खेळाडू आणणार नाही, परंतु यंदा महिन्या अखेरीस होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी आमच्या पर्यायांवर काम करत आहोत.” कॉनवेने 6 सामन्यात 129 धावा केल्या आहेत. याशिवाय टीम सेफर्ट कीपर-फलंदाजाच्या भूमिकेत लगेचच स्थान मिळण्याची शक्यता आहे.